धाराशिव (प्रतिनिधी)- कृषि पदवीधर युवाशक्ती संघटना, महाराष्ट्र राज्यच्या माध्यमातून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत विद्यार्थी, शेतकरी आणि पदवीधरांसाठी केलेल्या कार्याची दखल घेत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयदीप राजेंद्र ननावरे यांच्या मान्यतेने धवलसिंह विनोदराव लावंड यांची महाराष्ट्र विधान परिषद द्वैवार्षिक निवडणूक २०२६ साठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून संघटनेचे अधिकृत उमेदवार म्हणून सर्वानुमते उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
धवलसिंह लावंड हे कृषि पदवीधर युवाशक्ती संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष तथा धाराशिव जिल्हाध्यक्ष असून, ते आळणी (ता. जि. धाराशिव) येथील रहिवासी आहेत. विद्यार्थी, युवक, शेतकरी आणि पदवीधरांच्या प्रश्नांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून ते सक्रियपणे काम करत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. कृषि पदवीधर युवाशक्ती संघटनेने स्थापनेपासून मराठवाड्यात संघटनात्मक विस्तार करत आठही जिल्ह्यांत कार्यकर्ते व स्वयंसेवकांचे जाळे उभे केले आहे. शेती, माती, संस्कृती तसेच युवक व पदवीधरांच्या प्रश्नांसाठी संघटना सातत्याने कार्यरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आगामी पदवीधर निवडणुकीत संघटना स्वतंत्र भूमिका घेऊन मैदानात उतरणार असून, गावागावांत संघटनेचा विचार पोहोचवून युवक, शेतकरी व पदवीधरांच्या प्रश्नांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
धवलसिंह लावंड हे राष्ट्रीय खेळाडू असून उच्चशिक्षित युवक म्हणून त्यांची ओळख आहे. युवक, विद्यार्थी, शेतकरी आणि पदवीधरांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने काम केले असून, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला आणि सामाजिक प्रश्नांवर सक्रियपणे भूमिका घेणारा युवक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
“कृषि पदवीधर युवाशक्तीच्या माध्यमातून व्यापक जनहितासाठी काम करणाऱ्या युवकांना एकत्र आणून बदलाची नवी दिशा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आगामी पदवीधर निवडणुकीत संघटनेचे स्वतंत्र अस्तित्व ठामपणे मांडले जाईल,” असा विश्वास संस्थापक अध्यक्ष जयदीप राजेंद्र ननावरे यांनी व्यक्त केला.
