धाराशिव (प्रतिनिधी)- विधान परिषद औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील नगर परिषद हद्दीतील जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालय आणि सर्व शासकीय विश्रामगृहाच्या ठिकाणी प्रशासनाचे अनेक निर्बंध 28 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत लागू राहणार आहेत.
भारतीय निवडणूक आयोगाने विधान परिषद औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याच्या दिवसापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. या दरम्यान मिरवणूक, मोर्चा, आंदोलन, निदर्शने, उपोषण, घोषणा, निवडणूक प्रचार आदींवर बंदी घालण्यात आली आहे. निवडणूक प्रचाराच्या वाहनावरील झेंडे, कापडी फलकावर निर्बंध घातले आहेत. जिल्ह्यात कोठेही शस्त्रात्रे वाहून नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. एका ताफ्यात 10 पेक्षा अधिक मोटार गाड्या, मोटारसायकली किंवा वाहनांच्या वापरास मनाई करण्यात आली आहे. या दरम्यान जात, धर्म, भाषावार मेळावे घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. नमुना मतपत्रिका छपाईवर 31 ऑक्टोबरपर्यंत निर्बंध लावण्यात आले आहेत. सार्वजनिक इमारती, रस्त्यावर पोस्टर्स, बॅनर व कमानी लावण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. धार्मिक स्थळे, रूग्णालये व शैक्षणिक संस्था जवळ तात्पुरत्या पक्ष कार्यालयांना निर्बंध घालण्यात आले आहेत.