तुळजापूर (प्रतिनिधी)- नगरपरिषदेच्या सिटी सर्व्हे क्रमांक 972 मधील भाजी मंडईसाठी भूसंपादित 731 चौरस मीटर जागेवर सुरू असलेल्या बांधकामासंदर्भात तुळजापूर नगरपरिषदेने पुन्हा नोटीस बजावली आहे.

नगरपरिषदेच्या नोटिशीनुसार, सदर जागेचा भूसंपादन निवाडा 30 ऑक्टोबर 1978 रोजी नगरपरिषदेच्या नावे झाला असून नुकसानभरपाई अदा करण्यात आली आहे. तसेच, भूसंपादन रद्द झाल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचे आणि अंतिम निवाडा व्यपगत झालेला दिसत नसल्याचे भूसंपादन अधिकारी, धाराशिव यांच्या अहवालात नमूद असल्याचे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे.

संबंधित जागेवरील बांधकाम तात्काळ थांबविण्याचे निर्देश देण्यात आले असून, अन्यथा महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 52 व 53 तसेच इतर लागू कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आता नगरपरिषद बांधकाम परवानगी, भूसंपादनाचे अभिलेख आणि जागेच्या कायदेशीर स्थितीबाबत पुढे काय भूमिका घेते, का अशाच नोटीस नोटीस कार्यक्रम चालू राहतो याकडे तुळजापूरच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.


 
Top