तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पूर्वतयारीला तुळजापूर नगरीत वेग आला आहे. श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवा पूर्वीच्या मंचकि निद्रेस शनिवार दि. 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी प्रारंभ होणार आहे.
यंदा 11 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होत आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या नवरात्रोत्सवात तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी किती भाविक तुळजापूरमध्ये दाखल होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाविकांच्या संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पार्किंग, वाहतूक, दर्शन व्यवस्था, सुरक्षा, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि आरोग्य सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे.
यंदाच्या नवरात्रोत्सवातील महत्त्वाचा बदल म्हणून श्री तुळजाभवानी मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर भाविकांना बाहेर पडण्यासाठी स्टेडियमच्या ठिकाणी पायऱ्यांचे काम करण्यात आले आहे. हे काम सुमारे 80 टक्के पूर्णत्व आले असून, उर्वरित कामालाही वेग देण्यात आला आहे. घाटशीळ वाहनतळ पायऱ्या मार्गे भाविकांना दर्शणार्थ सोडले जाणार आहे. तर दर्शन घेऊन बाहेर पडणाऱ्या भाविकांना नव्याने पायऱ्यांच्या मार्गाने सोडण्यात येणार असून, या मार्गामुळे भाविकांना बाह्य मार्गाने राजमाता जिजाऊ महाद्वारापर्यंत जाता येणार आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या आणि दर्शनानंतर बाहेर पडणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे विभाजन होऊन मंदिर परिसरातील गर्दी नियंत्रणास मदत होण्याची अपेक्षा आहे
जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांनी तुळजापूर शहरातील नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या विविध तयारीची पाहणी केली. त्यांनी घाटशिळ पार्किंग, हडको मैदान पार्किंग, अग्निशामक पार्किंग तसेच धाराशिव रोड, लातूर रोड आणि नळदुर्ग रोडवरील पार्किंग व्यवस्थेची पाहणी केली. नंतर मंदिर कार्यालयात बैठक घेऊन आढावा घेतला.
पाहणीवेळी पोलीस अधीक्षक रितू खोकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, नगराध्यक्ष तथा विश्वस्त विनोद गंगणे, उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त ओंकार देशमुख, तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, सहायक व्यवस्थापक (प्रशासन) नागेश शितोळे, सहायक व्यवस्थापक (सामान्य) जयसिंग पाटील यांच्यासह मंदिर संस्थानचे अधिकारी उपस्थित होते.

