वाशी (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थिनींना महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि साधेपणाच्या विचारांची तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या प्रामाणिकपणा, देशसेवा व ‘जय जवान, जय किसान' या विचारांची माहिती देण्यात आली. विद्यार्थिनींनीही महापुरुषांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त करून त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात प्रशालेचे मुख्याध्यापक अभिमन्यू गवळी सर यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगत विद्यार्थिनींनी सत्य, अहिंसा, शिस्त, स्वच्छता आणि देशप्रेमाची मूल्ये आपल्या आचरणात आणावीत, असे मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्राच्या जडणघडणीत या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांचे योगदान अधोरेखित केले. या कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक अभिमन्यू गवळी यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
