धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात निर्माण झालेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे 100% नुकसान झाले असून सध्या सुरू असलेल्या पंचनाम्यांमध्ये कागदपत्रांची कोणतीही अट न ठेवता सरसकट पंचनामे करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
जिल्ह्यात भीषण दुष्काळामुळे खरीप व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सध्या शासकीय पातळीवर नुकसानग्रस्त क्षेत्रांचे पंचनामे करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र, हे पंचनामे करत असताना कार्यरत असलेले अधिकारी आणि कर्मचारी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी, आधार क्रमांक, बँकेचे नाव, खाते क्रमांक, कोड, मोबाईल क्रमांक आणि जीओ टॅगिंग फोटो यांसारख्या विविध कागदपत्रांची व माहितीची सक्ती करत असल्याचे समोर आले आहे.
आधीच अस्मानी संकटामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना या कागदपत्रांच्या सक्तीमुळे अनावश्यक मनस्ताप आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे आ. पाटील यांनी पत्रात म्हटले.
ग्रामीण भागातील अनेक भागांत इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा मोठा प्रश्न आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना ही माहिती तातडीने गोळा करणे अशक्य होत आहे. केवळ कागदपत्रे वेळेत उपलब्ध नाहीत म्हणून प्रत्यक्ष नुकसान झालेले शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. “पंचनाम्याचा मुख्य हेतू हा प्रत्यक्ष झालेल्या पीक नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद करणे हा असायला हवा, ना की कागदपत्रांची पडताळणी करणे. त्यामुळे प्रशासनाने आधी केवळ प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या आधारे सरसकट 100% बाधित क्षेत्र म्हणून नोंद करून पंचनामे पूर्ण करावेत,“ असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावरून तात्काळ आदेश काढून कोणत्याही कागदपत्रांअभावी पंचनामे रोखले जाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.
