भूम (प्रतिनिधी)- महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील महसूल विभागांतर्गत प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे आपापसातील तडजोडीने व सहमतीने निकाली काढण्यासाठी ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत भूम तहसील कार्यालयात बुधवार, दि. 7 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत महसूल लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
महसूल विभागातील अर्धन्यायिक दावे दाखल झाल्यानंतर विविध कारणांमुळे ते प्रलंबित राहतात. त्यामुळे पक्षकारांना न्याय मिळण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. निकालानंतरही एखाद्या पक्षाचे समाधान न झाल्यास वरिष्ठ न्यायालयात पुन्हा महसुली प्रतिदावा दाखल होण्याची शक्यता असते. परिणामी अनेक महसुली दावे वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात.
या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या परस्पर संमतीने महसुली दावे तडजोडीने निकाली काढण्यासाठी लोकअदालतीच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पक्षकारांनी या संधीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त प्रकरणे परस्पर सहमतीने निकाली काढण्यासाठी सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भूम तहसील कार्यालय तसेच मंडळ अधिकारी कार्यालय येथे दाखल असलेली दावे व प्रकरणे या महसूल लोकअदालतीमध्ये तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत. संबंधित पक्षकारांनी लोकअदालतीमध्ये तडजोडीने प्रकरण निकाली काढण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज दि. 5 ऑक्टोबर 2026 पर्यंत सादर करावा, असे आवाहन तहसीलदार, भूम यांच्याकडून करण्यात आले आहे.