तुळजापूर (प्रतिनिधी)- खरीप हंगाम 2026 मध्ये जून महिन्यापासून आजपर्यंत झालेली पर्जन्याची तूट तसेच अन्य नैसर्गिक घटकांमुळे धाराशिव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित तालुक्यांमध्ये ट्रिगर-1 (प्रथम कळ) लागू झाल्याने पिक पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार तुळजापूर तालुक्यात मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामविकास अधिकारी शेतकऱ्यांच्या शेतशिवारात जाऊन नुकसानीची पाहणी करून पंचनामे करीत आहेत. यावेळी सोयाबीनच्या शेंगात ज्वारीपेक्षाही लहान दाणे असल्यामुळे 10 टक्के ही उत्पन्नाची खात्री दिसून येत नाही.
तुळजापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरू असलेल्या पाहणीदरम्यान खरीप पिकांची दयनीय अवस्था समोर येत आहे. विशेषतः सोयाबीन पिकाला पावसाच्या दीर्घ खंडाचा मोठा फटका बसला असून अनेक शेतांमध्ये सोयाबीनच्या शेंगा भरलेल्या नसल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी शेंगांमधील दाणे ज्वारीच्या दाण्यापेक्षाही लहान असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या पिकातून दहा टक्के उत्पादन मिळण्याचीही खात्री नसल्याची व्यथा शेतकरी पंचनाम्यावेळी अधिकाऱ्यांसमोर मांडत आहेत.
तुळजापूर रुरलमध्ये ग्रामस्तरीय समितीकडून पाहणी
तुळजापूर रुरल परिसरात ग्रामस्तरीय समितीने शेतशिवारात जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. यावेळी शहर तलाठी शरद दूधभाते पंडितराव जगदाळे, राजाभाऊ देशमाने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष दुर्वास भोजने, विष्णू गेट, आबा भोजने, शहाजी जगदाळे, रवी शेरेकर, विकास भोजने यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक आणि मंडळ अधिकारी उपस्थित होते. मंगरूळ शिवारात ग्राम महसूल अधिकारी रोडगे, ग्रामविकास अधिकारी लक्ष्मीकांत सुरवसे आणि कृषी सहाय्यक पवार यांनी पाहणी केली. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची अवस्था, पावसाचा परिणाम, सोयाबीनच्या शेंगांची स्थिती आणि अपेक्षित उत्पादन याची पाहणी केली. नुकसानग्रस्त क्षेत्राची नोंद घेऊन पंचनाम्याची प्रक्रिया करण्यात आली. पंचनामे झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता नुकसानभरपाईची प्रतीक्षा आहे.
