धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील कचरा डेपो हलविण्याची मागणी ठाकरे पक्षाकडून मुंबईच्या प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. 24 तासात त्या निवेदनाची दखल मंडळाने घेतली. लातूर विभागीय कार्यालयाचे अधिकारी यांनी कचरा डेपोची पाहणी केली. या पाहणीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करणार असल्याच सांगत कारवाईचे संकेत दिले आहेत. यावेळी त्यांनी येथील नागरीक, विद्यार्थी, महिला, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली.
गेल्या कित्येक वर्षांपासून कचरा डेपो हलविण्याची मागणी सातत्याने होत असते. पण याविषयी फक्त आश्वासन दिले जातात प्रत्यक्षात परिस्थीती जैसे थे आहे. याबाबत युवासेना जिल्हाप्रमुख रविंद्र वाघमारे यांनी सातत्याने या प्रश्नाला वाचा फोडत पाठपुरावा कायम ठेवला आहे. गुरुवारी ( ता.15) त्यांनी नगरसेवक पंकज पाटील यांच्या सोबत थेट मुंबई येथे जाऊन प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दिली. शिवाय नागरिकाच्या आरोग्याशी संबंधित यंत्रणा कशी खेळत आहे हे सप्रमाण दाखवून दिले. दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी मंडळाचे अधिकारी यांनी कचरा डेपोची पाहणी करून परिस्थीती बघितली. शिवाय नगर पालिका प्रशासन यांनाही अनेक प्रश्न विचारले. त्यांनी अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केल्यानंतर कार्यवाहीची प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न घेऊन आम्ही लढत आहोत. नगरपालिकेच्या दारात कचरा टाकून निषेध केला.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहा दिवस उपोषण केले. तरीही या प्रश्नाची नगरपालिका,जिल्हा प्रशासनाने दखल घेतलेली नाही त्यामुळे आता प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून न्यायाची अपेक्षा आहे. हा लढा कचरा डेपो हाटत नाही तोपर्यंत चालूच राहणार आहे.
रवींद्र वाघमारे- युवा सेना जिल्हाप्रमुख
नगरपालिका व जिल्हा प्रशासन एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. 25 एकर जागा बघितल्याचं प्रशासन सांगत असलं तरी ती नेमकी जागा कुठं? हे अद्याप गुलदस्त्यात आहे मग हे कळणार कसं आणि याची मोजणी होणार कधी? हा निव्वळ वेळकाढूपणा आहे.
पंकज पाटील - नगरसेवक
नगरपालिका या प्रश्नाच्या सोडवणुकीसंदर्भात सकारात्मकच आहे. जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे पर्याप्त जागेसाठी मागणी केलेली आहे शिवाय 25 एकर जमीन मंजूर देखील येत्या काही दिवसात होणार आहे. त्यामुळे लवकरच हा प्रश्न सुटेल .
नीता अंधारे - मुख्याधिकारी, नगर परिषद

