धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्ह्यातील 4 लाख 77 हजार 44 शेतकऱ्यांना एकूण 238 कोटी 52 लाख 20 हजार रुपये मिळणार आहेत. पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येणार आहे. सदर मदत लाभ हस्तांतरण (डीबीडी) प्रणालीद्वारे खात्यात जमा होणार आहे. मात्र, जिल्ह्यातील 70 हजार 693 शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी प्रक्रिया अपूर्ण असल्याने त्यांना मदत मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सुमारे 53 कोटी 34 लाख रुपयांचे वाटप रखडण्याची शक्यता असून, कृषी विभागाकडून नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगामात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने अग्रिम मदतीचा निर्णय घेतला आहे. राज्यातील दुष्काळ जाहीर केलेल्या 304 तालुक्यांतील शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयाचा लाभ धाराशिव जिल्ह्यातील 4 लाख 77 हजार 44 शेतकऱ्यांना होणार आहे. 

आवश्यक ॲग्रीस्टॅक नोंदणी प्रक्रिया पूर्ण नसलेल्या शेतकऱ्यांसमोर मदत मिळणे कठीण होणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे एकूण 238 कोटी 52 लाख 20 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, या उद्देशाने थेट खात्यात रक्कम जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तातडीचा आर्थिक आधार मिळावा, हा या निर्णयामागील उद्देश आहे. खरीप पिकांचे नुकसान झाल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना या अग्रिम मदतीतून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. 

जिल्ह्यातील 70 हजार 693 शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि ॲड्रेस टॅगची प्रक्रिया पूर्ण नसल्यामुळे त्यांना अग्रिम मदत मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आवश्यक नोंदणी पूर्ण केल्याशिवाय संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होण्यात अडथळे येऊ शकतात. या शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे सुमारे 35 कोटी 34 लाख 65 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. त्यामुळे नोंदणीअभावी एवढ्या रकमेचे वितरण रखडण्याची शक्यता आहे.  ॲग्रीस्टॅक नोंदणीअभावी शेतकऱ्यांना शासकीय मदतीपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी कृषी विभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. 


धाराशिव जिल्ह्यातील एकूण खातेदार -

तालुका - खातेदार शेतकरी - ऍग्रीस्टॅक नोंदणी असलेले -  नोंदणी नसलेले 

भूम - 55583 - 46816 - 8767

धाराशिव -90527 - 74753 - 15774

कळंब - 64791 - 57583 - 7208

लोहारा - 30740 - 26871 - 3869

उमरगा - 58761 - 52971 - 5790

परंडा - 54403 - 47461 - 6942

तुळजापूर - 88151 - 69964 - 18187

वाशी - 34088 - 29932 - 4156

एकूण - 477044 - 406351 - 70693


तालुकानिहाय मिळणारी अग्रिम मदत - 

भूम - 27 कोटी 79 लाख 

धाराशिव - 45 कोटी 26 लाख 

कळंब - 32 कोटी 39 लाख 

लोहारा - 15 कोटी 37 लाख 

उमरगा - 29 कोटी 38 लाख 

परंडा - 27 कोटी 20 लाख 

तुळजापूर - 44 कोटी 7 लाख 

वाशी - 17 कोटी 4 लाख

 
Top