धाराशिव (प्रतिनिधी)- कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून पुन्हा नव्या उमेदीने शेती करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे.22 ऑक्टोबर 2026 रोजी राज्यस्तरावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या या यादीत एकापेक्षा जास्त बँकांमध्ये कर्जखाती असलेल्या आणि दोन लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या राज्यातील एक लाख 15 हजार 697 पात्र शेतकऱ्यांचा समावेश आहे.यामध्ये जिल्ह्यातील एक हजार 661 शेतकऱ्यांचा समावेश असून,त्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या याद्यांमध्ये एकूण 83 हजार 712 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला असून,त्यापैकी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या 49 हजार 794 शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर 457 कोटी 18 लाख रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे.पाचव्या यादीतील पात्र शेतकऱ्यांनी दोन दिवसांत आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,धाराशिव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
बँकांकडून घेतलेल्या पीककर्जाची परतफेड करता न आल्यामुळे राज्यातील अनेक शेतकरी थकबाकीदार झाले होते. परिणामी,त्यांना नव्याने पीककर्ज मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. एकीकडे शेतीसाठी भांडवलाची गरज आणि दुसरीकडे जुन्या कर्जाचा वाढता बोजा,अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने 2 जून 2026 रोजी शासन निर्णय निर्गमित करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली.थकीत शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरूपी मुक्त करणे आणि त्यांना पुन्हा नव्याने कर्जवाटपासाठी पात्र बनविणे,हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
या शासन निर्णयानुसार 1 एप्रिल 2019 नंतर वाटप करण्यात आलेले आणि 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेले दोन लाख रुपयांपर्यंतचे अल्पमुदत पीककर्ज कर्जमुक्ती योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.त्याचप्रमाणे 30 सप्टेंबर 2025 रोजी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकरकमी कर्जफेड योजना अर्थात ओटीएस लागू करण्यात आली आहे.या योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी दोन लाख रुपयांवरील कर्जाची रक्कम 31 मार्च 2027 पूर्वी भरल्यास राज्य शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंतचा लाभ देण्यात येणार आहे.याशिवाय नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची तरतूदही शासन निर्णयात करण्यात आली आहे.कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभाची प्रक्रिया पारदर्शक व संगणकीकृत पद्धतीने राबविण्यासाठी महा-आयटीच्या माध्यमातून स्वतंत्र संगणकीय पोर्टल विकसित करण्यात आले आहे.या पोर्टलवर संबंधित बँकांकडून थकीत अल्पमुदत पीककर्जदार शेतकऱ्यांची माहिती नोंदविण्यात आली. प्राप्त माहितीवर महा-आयटीकडून संगणकीय प्रक्रिया करून पात्र शेतकऱ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभाची प्रक्रिया पारदर्शक व संगणकीकृत पद्धतीने राबविण्यासाठी महा-आयटीच्या माध्यमातून स्वतंत्र संगणकीय पोर्टल विकसित करण्यात आले आहे.या पोर्टलवर संबंधित बँकांकडून थकीत अल्पमुदत पीककर्जदार शेतकऱ्यांची माहिती नोंदविण्यात आली.प्राप्त माहितीवर महा-आयटीकडून संगणकीय प्रक्रिया करून पात्र शेतकऱ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
राज्य शासनाने 22 जुलै 2026 रोजी 533 शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध केली. त्यानंतर 24 जुलै रोजी 16 लाख 96 हजार 201 शेतकऱ्यांची दुसरी यादी,11 सप्टेंबर रोजी चार लाख 19 हजार 737 शेतकऱ्यांची तिसरी यादी आणि 12 ऑक्टोबर रोजी तीन लाख 51 हजार 192 शेतकऱ्यांची चौथी यादी प्रसिद्ध करण्यात आली.शासनाकडून पहिल्या चार याद्यांमध्ये एकूण 24 लाख 67 हजार 130 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचा समावेश झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर 22 ऑक्टोबर रोजी एकापेक्षा जास्त बँकांमध्ये कर्जखाती असलेल्या आणि दोन लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या एक लाख 15 हजार 697 पात्र शेतकऱ्यांची पाचवी यादी आधार प्रमाणीकरणासाठी राज्यस्तरावर जाहीर करण्यात आली आहे.
धाराशिव जिल्ह्यातही या योजनेची अंमलबजावणी सुरू असून,प्रसिद्ध झालेल्या याद्यांमध्ये मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. 24 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या यादीत जिल्ह्यातील 46 हजार 915 थकीत पीककर्जदार शेतकऱ्यांचा समावेश होता.11 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या तिसऱ्या यादीत आणखी 21 हजार 966 शेतकऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली.त्यानंतर 12 ऑक्टोबर रोजीच्या चौथ्या यादीत 13 हजार 700 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला.आता 22 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या पाचव्या यादीत जिल्ह्यातील आणखी एक हजार 661 थकीत पीककर्जदार शेतकऱ्यांची गावनिहाय नावे प्रसिद्ध झाली आहेत. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार,आतापर्यंतच्या सर्व याद्यांमध्ये जिल्ह्यातील एकूण 83 हजार 712 शेतकऱ्यांचा समावेश आहे.
कर्जमुक्तीच्या या याद्या शेतकऱ्यांना सहज उपलब्ध व्हाव्यात,यासाठी त्या विविध मोबाईल समूहांवर प्रसारित करण्यात आल्या आहेत.तसेच प्रत्येक गावातील ग्रामपंचायत कार्यालय,तलाठी कार्यालय आणि गावच्या चावडीवरही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या गावातील प्रसिद्ध यादीत नाव असल्याची खात्री करून घ्यावी.जिल्ह्यात आतापर्यंत आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या 49 हजार 794 शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर 457 कोटी 18 लाख रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे.यामुळे संबंधित शेतकऱ्यांना जुन्या कर्जाच्या ओझ्यातून मुक्त होण्यास मदत झाली असून,नव्याने पीककर्ज मिळण्याच्या दृष्टीनेही दिलासा मिळणार आहे.
प्रसिद्ध करण्यात आलेली पाचवी यादी ही कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांची असून,या यादीतील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे एकापेक्षा जास्त बँकांकडून पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.या यादीमध्ये दर्शविण्यात आलेली कर्जथकबाकी 31 मार्च 2026 रोजीची असून,1 एप्रिल 2026 नंतरचे व्याज आणि इतर खर्च माफ करण्यात येणार आहेत.त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी 31 मार्च 2026 रोजीच्या आपल्या कर्जथकबाकीची खातरजमा करून जवळच्या 'आपले सरकार सेवा केंद्रा'मध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे.
राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकांशी संबंधित काही शेतकऱ्यांची 31 मार्च 2026 रोजीची कर्जथकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असली,तरी शासनाच्या 'हेअरकट' धोरणानुसार संबंधित शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जखाती निरंक करण्यात येणार आहेत.त्यामुळे अशा पात्र शेतकऱ्यांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.
कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांमध्ये मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचा तसेच वृद्धत्वामुळे किंवा बोटांचे ठसे स्पष्ट उमटत नसल्यामुळे आधार प्रमाणीकरणात अडचणी येणाऱ्या लाभार्थ्यांचाही समावेश आहे.अशा लाभार्थ्यांना कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी राज्य शासनाने 19 ऑगस्ट 2026 रोजी स्वतंत्र मानक कार्यप्रणाली अर्थात एसओपी निर्गमित केली आहे.या कार्यप्रणालीनुसार संबंधित पात्र लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.आवश्यक आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर जमा करण्यात येणार आहे.
पाचव्या यादीतील सर्व पात्र शेतकरी कर्जमाफी योजनेतील लाभार्थी असल्यामुळे त्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळविण्यासाठी बँकेकडे कोणतीही रक्कम भरावी लागणार नाही,असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या नावाखाली कोणतीही रक्कम बँकेत भरण्याची आवश्यकता नाही.मात्र,यादीत नाव असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याने जवळच्या 'आपले सरकार सेवा केंद्रा'मध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करणे आणि ॲग्रीस्टॅक क्रमांक देणे आवश्यक आहे.आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच संबंधित शेतकऱ्याला कर्जमुक्तीचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी विलंब न करता येत्या दोन दिवसांत आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान,कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू असून,आगामी काही दिवसांत सहावी आणि आवश्यकता भासल्यास सातवी यादीही प्रसिद्ध करण्यात येणार आहे.त्यामुळे आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या याद्यांमध्ये नाव नसलेल्या शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 नंतर अल्पमुदत पीककर्ज घेतले आहे आणि ते कर्ज 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत होते,अशा शेतकऱ्यांनी पुढील यादीतील आपल्या नावाबाबत संबंधित बँक शाखेशी संपर्क साधावा.पात्रतेनुसार त्यांची नावे आगामी याद्यांमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना कर्जाच्या बोज्यातून मुक्त करून पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची ठरत आहे.मात्र,योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.त्यामुळे प्रसिद्ध यादीतील प्रत्येक पात्र शेतकऱ्याने आपल्या कर्जथकबाकीची खात्री करून आधार प्रमाणीकरण व ॲग्रीस्टॅक क्रमांक देण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी.तसेच यादीत नाव नसलेल्या पात्र शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखेशी संपर्क साधून आवश्यक माहिती घ्यावी,असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,धाराशिव यांनी केले आहे.