धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात 11 ते 27 सप्टेंबर 2026 दरम्यान नवरात्र महोत्सव,तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी होणारी भाविकांची गर्दी तसेच जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विविध मागण्यांसाठी आंदोलने होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 1 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 1 वाजतापासून 14 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरून) संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

अपर जिल्हादंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये हा प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील आगामी कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता आणि कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये  अपर जिल्हादंडाधिकारी कडवकर यांनी जारी केला आहे.


नवरात्रोत्सवात भाविकांची मोठी गर्दी

जिल्ह्यात 11 ऑक्टोबर 2026 ते 27 ऑक्टोबर 2026 या कालावधीत नवरात्र महोत्सव साजरा होत आहे.या कालावधीत सार्वजनिक देवींची स्थापना करण्यात येते.तसेच जिल्ह्यातील सर्व देवी मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा करण्यात येतो.तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी जिल्ह्यातून,जिल्ह्याबाहेरून तसेच राज्याबाहेरून मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात.उत्सवाच्या कालावधीत महिला व पुरुष भाविकांची मोठी गर्दी होते.तसेच 11/06/2026 रोजीचे पूर्वी तुळजापूर येथून ज्योत घेऊन जाण्यासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यांतील व गावांतील भाविक तुळजापूर येथे येतात आणि ज्योत घेऊन आपापल्या गावी जातात.या कालावधीत रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था टिकून राहणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.


दुष्काळी परिस्थितीमुळे आंदोलनांची शक्यता

जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असून शेतकऱ्यांना शासनाने अनुदान द्यावे,पीक विमा देण्यात यावा तसेच पाणी आणि चाऱ्याची सोय करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी विविध संघटना व पक्षांकडून शासकीय कार्यालयांसमोर धरणे,आंदोलने, उपोषण,आत्मदहन आणि मोर्चे यासारखे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात विविध समाज,संघटना आणि पक्षांकडून विविध मागण्यांच्या अनुषंगाने शासकीय कार्यालयांसमोर तसेच जिल्ह्यात अचानकपणे धरणे,मोर्चे,आंदोलन, उपोषण,आत्मदहन,बंद,निदर्शने, तालाठोको आणि रास्तारोको आदी आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत आहे.


या बाबींना राहणार मनाई

पोलीस अधीक्षकांच्या अहवालावरून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश  जिल्हादंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये जारी केला आहे. शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीला कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने 1 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 1 वाजतापासून 14 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पुढील बाबी करण्यास मनाई करण्यात आली आहे.यामध्ये शस्त्र,सोटे,काठी,तलवार आणि बंदूक जवळ बाळगता येणार नाही.ताठपा, काठ्या तसेच शारीरिक इजा होण्यास कारणीभूत ठरतील व सहज हाताळता येतील अशा वस्तू बाळगता येणार नाहीत. कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटके जवळ बाळगता येणार नाहीत.दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा फोडावयाची अथवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने गोळा करून ठेवता येणार नाहीत,बाळगता किंवा तयार करता येणार नाहीत.

आवेशी भाषणे,अंगविक्षेपण किंवा विडंबनात्मक नकला करता येणार नाहीत. सभ्यता व नीतिमत्ता यांना बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल अथवा अराजकता माजेल अशी चित्रे,निशाणी,घोषणा फलक किंवा अन्य कोणत्याही वस्तू जवळ बाळगता येणार नाहीत.जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे,वाद्य वाजविणे किंवा देशाच्या संविधानातील मूल्यांच्या विरुद्ध असेल अथवा देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहोचविणारी,सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोख्याला हानी पोहोचविणारी कोणतीही कृती करता येणार नाही.तसेच जाहीरपणे प्रक्षोभक भाषण आणि असभ्य वर्तन करता येणार नाही.

व्यक्तींच्या किंवा शवांच्या किंवा प्रेतांच्या किंवा आकृती अथवा त्यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन करता येणार नाही.पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावाला परवानगीशिवाय एकत्र येता येणार नाही तसेच मिरवणूक किंवा मोर्चा काढता येणार नाही.


यांना आदेशातून सूट

प्रतिबंधात्मक आदेशातून काही बाबींना सूट देण्यात आली आहे.त्यामध्ये अंत्ययात्रा,धार्मिक विधी,लग्न सोहळा, सामाजिक सण व शासकीय कार्यक्रम इत्यादी शासकीय सेवेत तैनात कर्मचारी तसेच सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृहे,रंगमंच इत्यादींचा समावेश आहे.


मोर्चा-मिरवणुकीसाठी लेखी परवानगी बंधनकारक

प्रतिबंधात्मक आदेशाच्या कालावधीत कोणताही मोर्चा,मिरवणूक तसेच सभा किंवा निवडणूक प्रचार सभा आयोजित करावयाची असल्यास पोलीस अधीक्षक, धाराशिव किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी धाराशिव,तुळजापूर,उमरगा, कळंब अथवा भूम यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक राहणार आहे.अशी लेखी परवानगी घेतल्यानंतर संबंधित कार्यक्रमाला वरील प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही,असे अपर जिल्हादंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी जारी केलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.


 
Top