धाराशिव (प्रतिनिधी)- अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ग्रामीण भागातील विद्यार्थी जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेत असताना त्यांना निवासाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शासकीय वसतिगृह व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ महत्त्वाचा आहे. मात्र, वसतिगृह प्रवेशाच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने अनेक पात्र विद्यार्थी अर्ज सादर करण्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026 निश्चित करण्यात आली होती. अंतिम टप्प्यात समाज कल्याण विभागाचे ऑनलाइन पोर्टल तांत्रिक अडचणींमुळे बंद राहिल्याने ग्रामीण भागातील, विशेषतः जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज सादर करता आले नाहीत.

दहावी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी तसेच बारावी उत्तीर्ण होऊन उच्च शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा अत्यंत महत्त्वाची आहे. आर्थिक परिस्थितीमुळे जिल्ह्याच्या ठिकाणी राहण्याचा खर्च परवडत नसलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृह व स्वाधार योजनेचा आधार मिळतो.

केवळ ऑनलाइन पोर्टलमधील तांत्रिक अडचणीमुळे पात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. त्यामुळे वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत किमान 10 ते 15 दिवसांनी वाढवावी, तसेच पोर्टल सुरळीतपणे सुरू करून सर्व पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी समाज कल्याण विभाग व जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असलेली वसतिगृह सुविधा तसेच पात्र विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेच्या लाभासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करता यावी, यासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी राजाभाऊ राऊत यांनी केली आहे.

 
Top