धाराशिव (प्रतिनिधी)-  मुलगी जन्माला येण्याआधीच तिच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये,यासाठी गर्भलिंग निदान आणि लिंग निवडीला प्रतिबंध करणाऱ्या पीसीपीएनडीटी कायद्याची काटेकोर व प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. जिल्ह्यातील लिंग गुणोत्तरात अपेक्षित सुधारणा घडवून आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा, वैद्यकीय व्यावसायिक आणि संबंधित सर्व घटकांनी समन्वयाने काम करावे. असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. भाग्यश्री पाटील यांनी केले.

8 सप्टेंबर रोजी तुळजापूर येथील टाटा सामाजिक संस्था येथे पीसीपीएनडीटी,एमटीपी व सरोगसी कायदा तसेच लिंग गुणोत्तर या विषयावर आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी त्या बोलत होत्या.  न्या. पाटील पुढे म्हणाल्या की,मुलींच्या जन्मदरात होत असलेली घट ही केवळ आकडेवारीतील बाब नसून सामाजिकदृष्ट्या गंभीर आणि चिंताजनक विषय आहे.त्याचे दूरगामी परिणाम समाजाच्या लोकसंख्यात्मक समतोलावर होऊ शकतात.त्यामुळे मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे,लिंग निवडीला प्रतिबंध करणे आणि याविषयी समाजात व्यापक जनजागृती निर्माण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. 

कार्यशाळेत सोलापूर येथील डॉ. माणिक गुर्रम यांनी पीसीपीएनडीटी कायद्यातील विविध तरतुदी,त्याची प्रभावी अंमलबजावणी,सोनोग्राफी केंद्रांची नोंदणी तसेच आवश्यक अभिलेख व नोंदींच्या देखभालीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.हर्षलता लड्डा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. वीणा पाटील, जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. महेंद्र देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी फुलारी, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी, डॉ.अनिल चव्हाण, पीसीपीएनडीटी नोडल अधिकारी डॉ.दत्तात्रय खुणे आणि अमर सपकाळ आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमाकांत जोशी यांनी केले. तर डॉ.दत्तात्रय खुणे यांनी आभार मानले. 

 
Top