मुरूम (प्रतिनिधी)- गणेश नगर येथे राष्ट्रीय लघुउद्योग दिनाचे औचित्य साधून 'रोटरी क्लब मुरूम सिटी'च्या वतीने महिला बचत गटांसाठी लघुउद्योगांसंबंधी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मंगळवारी (ता. 1) करण्यात आले. या शिबिरात महिलांना स्वयंरोजगाराचे धडे देत आर्थिक स्वावलंबनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून धाराशिव येथील उद्योग व सेवा केंद्राचे सहाय्यक आयुक्त अमोल बळे उपस्थित होते. त्यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, महिलांनी शिलाई, पापड, शेवया, लोणचे, बटाटा चिप्स, कांदा पावडर, चटण्या आणि मसाले यासारखे लघुउद्योग सुरू करून स्वतःचा आर्थिक विकास साधावा. जिल्हा उद्योग केंद्रातर्फे महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना, व्यवसाय प्रकल्प, सुलभ कर्ज आणि शासकीय अनुदाने मंजूर केली जातात. बचत गटांमधील महिलांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, उपजत कलेतूनच खऱ्या अर्थाने उद्योगाची निर्मिती होते, असा मौलिक विचार त्यांनी मांडला.
कार्यक्रमास जिल्हा लघुउद्योग धाराशिवचे सहाय्यक अधिकारी अभिजीत लांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर सरपंच तथा महिला बचत गटाच्या सीआरपी उषा चव्हाण, पोलीस पाटील कलावती चव्हाण, रोटरी क्लब मुरूम सिटीचे अध्यक्ष कल्लय्या स्वामी, सचिव प्रकाश रोडगे, मल्लिकार्जुन बदोले, भूषण पाताळे आणि संतोष कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच विद्या जागृती संस्थेचे प्रतिनिधी राजेंद्र घोडके व रंजना लाळे यांचीही विशेष उपस्थिती लाभली. यावेळी रोटरी क्लब मुरूम सिटीच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बचत गटाच्या महिलांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. कार्यक्रमास बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. परिसरातील महिला वर्गात या उपक्रमाबद्दल उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
