धाराशिव (प्रतिनिधी)- शेतीसोबत कुक्कुट,शेळीपालन, मधुमक्षिकापालनासारख्या पूरक व्यवसायांची जोड दिल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. त्यासाठी शाश्वत आणि सर्वसमावेशक कृषी पद्धतींचा स्वीकार करण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान आणि यशस्वी प्रयोगांची माहिती शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. सकारात्मक आणि विकास पत्रकारितेतून अशा यशकथा समाजासमोर आल्यास शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. त्यामुळे धाराशिवसारख्या आकांक्षित जिल्ह्यांच्या विकास प्रक्रियेत माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत पत्र सूचना कार्यालय, मुंबई यांच्या वतीने धाराशिव येथे पत्रकारांसाठी आयोजित ‘वार्तालाप' माध्यम परिषदेत ते बोलत होते.‘आकांक्षित जिल्ह्यांसाठी शाश्वत शेतीचे सुलभीकरण' या प्रमुख संकल्पनेवर ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या हस्ते झाले.यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, पीआयबीचे माहिती व संचार अधिकारी हर्षल आकुडे,माहिती सहायक एडगर कोएल्हो आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी पुजार यांनी ‘वार्तालाप' कार्यशाळेच्या आयोजनाचे कौतुक केले. स्थानिक शेतकरी आणि ग्रामीण समुदायांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत आणि सर्वसमावेशक कृषी पद्धती अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले. सकारात्मक आणि विकासाभिमुख पत्रकारितेच्या माध्यमातून शेतीतील यशकथा समाजापर्यंत पोहोचल्यास शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होईल,असे पुजार यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी अशा प्रकारचे उपक्रम ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले. यावेळी डॉ.विनोद ढोले, सचिन हजारे, डॉ.सचिन सूर्यवंशी, राहुल काळे, ज्ञानेश्वर मलिले, हर्षल आकुडे, रघुनाथ जाधव, अनिता देवकडे यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अखेरीस पीआयबी मुंबईचे माहिती सहायक एडगर कोएल्हो यांनी आभार मानले. कार्यशाळेला जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे व प्रादेशिक व स्थानिक शासनमान्य वृत्तपत्रांचे प्रतिनिधी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन भैरवनाथ कानडे यांनी केले.
