धाराशिव (प्रतिनिधी)- पीक कापणी प्रयोग हा केवळ आकडेवारी नोंदविण्याचा भाग नसून, शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष नुकसानीचे वस्तुनिष्ठ चित्र समोर आणून त्यांना मिळणाऱ्या मदतीचा आधार ठरणारी महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे निर्धारित प्लॉटवर सुरू असलेल्या पीक कापणी प्रयोगावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित राहून ही प्रक्रिया पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने होत आहे की नाही, याची खात्री करावी जेणेकरून दुष्काळाची तीव्रता मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडली जाईल असे असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.
धाराशिव तालुक्यातील कोंड येथे मंगळवारी सकाळी सुरू असलेल्या पीक कापणी प्रयोगास आमदार पाटील यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहणी केली. यावेळी शिवारातील पिकांची स्थिती आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. पावसातील मोठे खंड, पिकांची खुंटलेली वाढ आणि अपेक्षित उत्पादनात झालेली घट यामुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर आर्थिक संकट निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. “उभे पीक दिसत असले तरी अपेक्षित उत्पादन मिळेलच, अशी परिस्थिती नाही. त्यामुळे कागदावरील आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती पीक कापणी प्रयोगातून अचूकपणे नोंदविली जाणे आवश्यक आहे,” असे पाटील यांनी स्पष्ट केले.
बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धाराशिव जिल्ह्यात येऊन दुष्काळी परिस्थितीचा पाहणी व आढावा घेणार आहेत. यावेळी पीक कापणी प्रयोगातून समोर येणारे वास्तव, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि दुष्काळाची तीव्रता मुख्यमंत्र्यांसमोर ठामपणे मांडणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. शेतकऱ्यांना तातडीचे नुकसान अनुदान, प्रभावी पीकविमा मदत, चारा व पाण्याची उपलब्धता तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी कृषी सहाय्यक संगीता भागवत पतंगे, तालुका कृषी अधिकारी सलमा तांबोळी, सोनाली गाडेकर, तलाठी श्री. माळी, मंडळ कृषी अधिकारी मजीद शेख, कृषी पर्यवेक्षक श्री. लेणेकर, विमा प्रतिनिधी अमर भडंगे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
