भूम (प्रतिनिधी)- पुणे येथे दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केलेल्या परंडा तालुक्यातील खासापुरी येथील प्रथमेश देशमुख या एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील त्यांच्यासोबत होते.

आमदार रोहित पवार यांनी प्रथमेशच्या मातोश्री व कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले आणि या कठीण प्रसंगी पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचा विश्वास दिला. यावेळी त्यांनी प्रथमेशच्या मातोश्रींच्या हाती आर्थिक मदतही सुपूर्द केली. कुटुंबाच्या परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर आ. पवार यांनी परंड्याचे तहसीलदार निलेश काकडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत प्रथमेशच्या मातोश्रींना घरकुल योजना तसेच निराधार योजनेचा लाभ तातडीने मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या.

प्रथमेश अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून एमपीएससीसह स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. त्याच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर वाढत चाललेला मानसिक, शैक्षणिक व आर्थिक ताण गंभीरपणे विचारात घेण्याची आवश्यकता असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

या सांत्वनपर भेटीवेळी माजी आमदार सुनील भुसारा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष फहाद अहमद, पंकजनाना बोराडे, रविकांत वरपे, जिल्हा सचिव सुहास ठोंगे, जिल्हा उपाध्यक्ष जोतीराम मिस्किन, तालुकाध्यक्ष किरण करळे, माजी सैनिक विभागाचे तालुकाध्यक्ष सुरेश कुंभार, युवक तालुकाध्यक्ष प्रवीण गरड, उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड, युवक कार्याध्यक्ष सज्जन गाडगे, सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष दशरथ चाबुकस्वार, तालुकाध्यक्ष ऋषिकेश पाटील, ठवरे मेजर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top