धाराशिव (प्रतिनिधी)- दिनांक 17 सप्टेंबर 2026 रोजी वाशी तालुक्यातील तेरखेडा गावातील गट क्रमांक 213 मध्ये स्थित भवानी फायर वर्क येथे महसूल व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकामार्फत अचानक धाड टाकून तपासणी करण्यात आली. फटाका कारखानासंबंधी आवश्यक सुरक्षा तरतुदी विस्फोटक नियम 2008 मध्ये नमूद आहे. सदर कारखान्याच्या तपासणीमध्ये या नियमातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या अनेक त्रुटी निदर्शनास आल्या आहेत. परवानामध्ये मंजूर साठ्यापेक्षा अधिक दारूचा/ गन पावडरचा साठा आढळून येणे, मंजूर नकाशामधील बांधकामापेक्षा अधिकचे बांधकाम करणे, कारखान्याला सर्व बाजूने सुरक्षा कुंपण नसणे, अग्निशमन विभागाची ना हरकत नसणे, अग्निशमन उपकरणे पुरेशा प्रमाणात नसणे, परवानाच्या नूतनीकरणाची प्रत सादर करणे इत्यादी प्रमुख त्रुटी आढळून आल्या आहेत. सदर कारखान्याच्या तपासणीमध्ये कारखाना व 40 कामगारांचा विमा काढल्याचे दिसून आले आहे. उपरोक्त त्रुटीमुळे सदर कारखान्याने विस्फोटक नियम 2008 मधील तरतुदीचे उल्लंघन केल्यामुळे तसेच त्या ठिकाणी जीवित व वित्त हानीचा धोका संभवत असल्याने मा. जिल्हाधिकारी, धाराशिव यांचे पुढील आदेशपर्यंत मिळेपर्यंत सदर कारखान्यास फटाक्याचे उत्पादन करण्यास प्रतिबंध करण्यात आलेले आहे. सदर तपासणीमध्ये तहसीलदार प्रकाश म्हेत्रे, पोलीस निरीक्षक श्री घोडके, नायब तहसीलदार श्रीकिसन सांगळे, सहाय्यक महसूल अधिकारी विजय अंकुशे, महसूल सेवक कौसर शेख, महेश राऊत, महसूल सेवक आलम सय्यद सहभागी झाले होते. विस्फोटक नियम 2008 मधील तरतुदीचे उल्लंघन करून तसेच मानवी जीवास धोका होईल अशा पद्धतीने दारुगोळा न हाताळण्याचे आवाहन तहसील कार्यालय वाशी यांच्या वतीने करण्यात येत आहे.

 
Top