धाराशिव (प्रतिनिधी)-  गेल्या वर्षी अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना यंदा पावसातील प्रदीर्घ खंडाने पुन्हा संकटात ढकलले आहे. सोयाबीनसह खरीप पिकांची वाढ खुंटली असून अनेक भागांत उभी पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. शेतात पीक करपतंय, घरात चिंता वाढतेय त्यामुळे बैठका, पंचनामे आणि अहवालांच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना अडकवून न ठेवता शासनाने आता थेट मदतीचा निर्णय घ्यावा. धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली.

नांदेड येथील जिल्हा नियोजन सभागृहात राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या अध्यक्षतेखाली (दि.19) छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील दुष्काळ व पीक परिस्थितीबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीस आमदार कैलास पाटील उपस्थित होते. त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून देत बळीराजाला तातडीने दिलासा देण्याची मागणी केली. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची उभी पिके वाहून गेली, अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आणि मोठ्या आर्थिक संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले.

या संकटातून सावरण्याची संधी मिळण्यापूर्वीच यंदा पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम पुन्हा संकटात सापडला आहे. एका वर्षी अतिवृष्टीने उद्ध्वस्त करायचे आणि दुसऱ्या वर्षी पावसाच्या खंडाने पिके करपवायची, अशा दुहेरी संकटात शेतकरी अक्षरशः भरडला जात असल्याचे आमदार पाटील यांनी बैठकीत सांगितले. बळीराजा संकटात असताना त्याला धीर देणे ही सरकारची जबाबदारी आहे. आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष मदत देण्यासाठी शासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने ठोस निर्णय घ्यावा, असे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी केले.


 
Top