धाराशिव (प्रतिनिधी)-  नवी मुंबई येथील कारवां फाऊंडेशनच्या वतीने आरोग्य, शिक्षण, निराधार व गरजूंसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा दरवर्षी फाऊंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात येतो. त्याच उपक्रमांतर्गत धाराशिव शहरातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुणवंतांचा सन्मान सोहळा शासकीय विश्रामगृहातील सभागृहात उत्साहात पार पडला.कारवां फाऊंडेशनच्या चेअरमन शाहिना मिरजणकर धाराशिव शहरात आल्यानंतर त्यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समिती,मतदार जनजागरण समिती व बहुजन योद्धा सामाजिक संस्थेच्या नियोजित जागेवरील तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस भेट दिली.यावेळी समित्यांच्या वतीने शाहिना मिरजणकर यांचे शाल,पुष्पगुच्छ तसेच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची मराठी व उर्दू भाषेतील प्रत आणि संविधान विश्लेषण पुस्तिका देऊन स्वागत करण्यात आले.शासकीय विश्रामगृहातील सभागृहात आयोजित सत्कार समारंभात कारवां फाऊंडेशनच्या वतीने डॉ. सय्यद तबस्सुम, गणेश वाघमारे, अब्दुल लतीफ, प्रा. अभिमान हंगरगेकर,डॉ. बाळासाहेब घाडगे, सरफराज पटेल आणि शेख रौफ यांना सन्मानचिन्ह,शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.उपस्थित मान्यवरांचाही शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी शाहिना मिरजणकर यांनी कारवां फाऊंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. डॉ.तबस्सुम सय्यद यांनी आपल्या सामाजिक कार्याची माहिती देताना शहरातील उघड्यावर राहणारे नागरिक,कुष्ठरोगी तसेच गरजु व्यक्तींना भोजन उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. त्यांच्या शाळेतील विद्यार्थी व कर्मचारी आपल्या जेवणाच्या डब्यासोबत शक्य असल्यास एक अतिरिक्त चपाती आणतात. या चपातींचे संकलन करून गरजू व्यक्तींना भोजन उपलब्ध करून दिले जाते. या उपक्रमासाठी शाळेच्या माध्यमातून नियमित व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास अंकुश उबाळे,संजय गजधने, प्रविण जगताप,बाबासाहेब गुळीग,धनंजय वाघमारे,राजेंद्र धावारे,अमन शेख,संपतराव शिंदे,प्रवीण बनसोडे,श्रीकांत गायकवाड मटकीवाले, अतुल लष्करे,श्री खैरे,बप्पा शिंदे यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन बहुजन योद्धा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सरफराज पटेल यांनी केले.सूत्रसंचालन बलभीम कांबळे यांनी केले, तर आभार गणेश वाघमारे यांनी मानले.

 
Top