धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप पिकांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर व्हावा यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींचा शासनस्तरावर आपला पाठपुरावा सुरू आहे. चारा डेपो, पाणी उपलब्ध करून देणे आणि रोजगार हमीची कामे सुरू करण्यालाही प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना तातडीने खरीप नुकसानीचे अनुदान आणि त्यानंतर पीकविमा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
धाराशिव तालुक्यातील उपळा शिवारात ग्रामस्थ व शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत आयोजित घोंगडी बैठकीत ते बोलत होते. आमदार पाटील यांनी प्रत्यक्ष शिवारात जाऊन पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांची पाहणीही केली. जिल्ह्यातील पिकांच्या गंभीर परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनासमोर ठेवण्यासाठी प्रथमच विद्यापीठातील शास्त्रज्ञ, मुंबई येथील आयआयटीतील वरिष्ठ तज्ज्ञ, महसूल व कृषी विभागाच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे केले आहेत. या पाहणीचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला सादरही करण्यात आला आहे. पिकांची सद्यस्थिती, पावसाचा खंड आणि संभाव्य नुकसान याबाबत मुद्देनिहाय वस्तुनिष्ठ माहिती या अहवालात देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी पंचनामे व नुकसानभरपाई निश्चित करताना या तांत्रिक माहितीचा मोठा उपयोग होणार असून, नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना मदत मिळवून देण्यासाठीही ती महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
