धाराशिव (प्रतिनिधी)- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड येथे दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीत धाराशिव-कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी लोडशेडिंगच्या मुद्द्यावरून सरकार आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी इमर्जन्सी लोडशेडिंगबाबत प्रशासनाला जाब विचारला. दरम्यान, वीज कमी पडत असेल तर वीज विकत घ्या अशा सूचना देखील आमदार कैलास पाटील यांनी केली.

बैठकीत उपस्थित असलेल्या ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांना आमदार कैलास पाटील यांनी “इमर्जन्सी लोडशेडिंग कशासाठी करता?” असा थेट सवाल केला. त्यावर मेघना बोर्डीकर यांनी लोडशेडिंग होत नसल्याचे सांगितले. त्यानंतर पाटील यांनी बैठकीतील अधिकाऱ्यांकडे याबाबत स्पष्ट माहिती मागितली.

यावेळी अधिकाऱ्यांनी “कधी कधी इमर्जन्सी लोडशेडिंग होते,” असे उत्तर दिले. मात्र, या उत्तरावर कैलास पाटील यांनी आक्षेप घेत “कधी कधी नाही, रोजच लोडशेडिंग आहे,” असे स्पष्टपणे सांगितले. विशेषतः संध्याकाळच्या वेळेत वीजपुरवठा खंडित होत असल्याचा मुद्दा त्यांनी बैठकीत मांडला. दरम्यान, बैठक सुरू असतानाच महावितरणाचे संचालक धनंजय औंडेकर हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले. राज्यात लोडशेडिंग नसल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर आमदार कैलास पाटील आणखी आक्रमक झाले.

“आपण खोटे बोलू नका. लोडशेडिंग आहे. खोटे बोलणे चुकीचे आहे. रोज संध्याकाळी इमर्जन्सी लोडशेडिंग केली जाते,” अशा शब्दांत कैलास पाटील यांनी महावितरणाच्या संचालकांना सुनावले. प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असताना कागदोपत्री लोडशेडिंग नसल्याचे सांगितले जात असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. कैलास पाटील यांनी यावेळी केवळ अधिकाऱ्यांनाच नव्हे, तर उपस्थित मंत्री आणि ऊर्जा विभागाचेही लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधले. राज्यात प्रत्यक्षात लोडशेडिंग सुरू असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे, असे त्यांनी बैठकीत सांगितले. विशेषतः शेतीसाठी आवश्यक असलेल्या वेळेत वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कैलास पाटील यांच्या आक्रमक भूमिकेनंतर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली. त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना आमदारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याची गांभीर्याने दखल घेण्याच्या सूचना दिल्या.

“यापुढे लोडशेडिंग होणार नाही, याची काळजी घ्या,” अशा स्पष्ट सूचना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनीही अधिकाऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना दिल्या.

त्यामुळे नांदेडमधील दुष्काळी आढावा बैठकीत लोडशेडिंगचा मुद्दा चांगलाच गाजला. आमदार कैलास पाटील यांनी प्रत्यक्ष गावपातळीवर सुरू असलेल्या वीजकपातीचा मुद्दा थेट बैठकीत मांडत प्रशासनाला जाब विचारला. त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर मंत्र्यांनीही महावितरणच्या अधिकाऱ्यांना लोडशेडिंग टाळण्याच्या सूचना दिल्याने हा मुद्दा बैठकीचा केंद्रबिंदू ठरला.


 
Top