तुळजापूर (प्रतिनिधी)- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शहरातील उपलब्ध पाणीसाठ्याचे जतन करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत तुळजापूर नगरपरिषदेने यंदा पर्यावरणपूरक मातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होऊ नयेत, यासाठी गणेशमूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये न करता कृत्रिम हौदांमध्ये करावे अथवा मूर्तीदानाचा संकल्प करावा, असे आवाहन नगराध्यक्ष विनोद गंगणे व मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी केले.

तुळजापूर नगरपरिषद कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित गणेश आरतीनंतर ते बोलत होते. प्रारंभी पत्रकारांच्या हस्ते विघ्नहर्ता गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष विनोद गंगणे, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, गटनेते औदुंबर कदम, गटनेते अमोल कोतवाल, नगरसेवक सागर कदम, नगरसेवक पंडित जगदाळे, लखन पेंदे, चंद्रशेखर भोसले आनंद जगताप रणजीत इंगळे  यांच्यासह नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते.


पाचुंदा तलावात विसर्जन टाळा : रणदिवे

मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे म्हणाले की, यंदाची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाचुंदा तलावाची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे या जलसाठ्यात मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन करू नये. लहान मूर्तींच्या कृत्रिम हौदांचा वापर करावा, तसेच नागरिकांनी शक्य असल्यास मूर्तीदानाचा पर्याय स्वीकारावा, असे त्यांनी सांगितले.


प्रभागनिहाय कृत्रिम हौद उभारण्याचे आवाहन नगराध्यक्ष गंगणे 

नगराध्यक्ष विनोद गंगणे म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. त्यामुळे गणेशमूर्ती विसर्जनामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत प्रदूषित होणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक आहे. नगरसेवकांनी आपल्या-आपल्या प्रभागात कृत्रिम हौदांची व्यवस्था करून नागरिकांना पर्यावरणपूरक विसर्जनासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.


मूर्तीदानातून पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम

धाराशिव येथील मूर्ती संकलन उपक्रमाशी संबंधित सूरज शिंदे यांनी सांगितले की, गणेशमूर्ती पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये विसर्जित केल्याने पाणी प्रदूषित होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांनी मूर्तीदानाचा संकल्प करावा. संकलित केलेल्या पीओपीच्या मूर्ती कला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना मूर्तीकला व रंगकामाचा सराव मिळेल आणि पुढील वर्षी त्याच मूर्तींचा पुनर्वापर करता येईल, असा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

सार्वजनिक गणेश मंडळांनी मोठ्या मूर्तींचे दान करून पुढील वर्षी त्या इतर मंडळांना देण्याचा उपक्रम राबवावा. मूर्ती खरेदीवर होणारा खर्च वाचवून त्यातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


जिल्ह्यात अडीचशे मंडळांचा मूर्तीदानाचा संकल्प

पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमाला जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांकडून प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत सुमारे 250 गणेश मंडळांनी मूर्तीदानाचा संकल्प केल्याचे शिंदे यांनी सांगितले. यंदा सुमारे 11 हजार गणेशमूर्ती संकलित होण्याची शक्यता असून त्यासाठी 55 वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत. गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड देत तुळजापूर नगरपरिषदेने घेतलेला हा उपक्रम शहरातील गणेश मंडळे आणि नागरिकांसाठी अनुकरणीय ठरणार आहे.


 
Top