धाराशिव (प्रतिनिधी)- अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाई करताना धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भाटसांगवी पाटीजवळ एका इसमास गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले. नवनाथ उर्फ बालाजी बब्रुवान काळे (रा. भाटसांगवी, ता. कळंब) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून २६ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. आज (दि.१९) पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती घेऊन कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथक कळंब येथील चौकात आले असता भाटसांगवी पाटीजवळ एक इसम गावठी पिस्टल घेऊन थांबला असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
माहितीची खात्री करून पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले. त्यानंतर पथकाने तत्काळ भाटसांगवी पाटीजवळ जाऊन सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास संशयित इसमाला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव नवनाथ उर्फ बालाजी बब्रुवान काळे असे सांगितले.
पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला खोवलेले लोखंडी धातूचे, लाकडी पिस्टल ग्रीप असलेले गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस मिळून आले. या मुद्देमालाची एकूण किंमत २६ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याच्याविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीला कळंब पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे
