परंडा (प्रतिनिधी)- शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय, परंडा येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मराठवाड्याच्या मुक्तीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मे व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी रामानंद तीर्थ तसेच श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिवचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी रा.गे.शिंदे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्मे आणि स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्यासाठी केलेल्या त्यागाचे स्मरण करून दिले. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने देशाच्या हितासाठी प्रामाणिकपणे कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. रा.गे.शिंदे गुरुजी यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या वतीने विविध शैक्षणिक व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. परंडा शहर व तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम अशा स्वरूपात पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

व्यासपीठावर प्राचार्य डॉ.सुनील जाधव, उपप्राचार्य डॉ. महेशकुमार माने, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक डॉ. किरण देशमुख, स्टाफ सेक्रेटरी डॉ. शहाजी चंदनशिवे, शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ. कृष्णा परभणे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी परंडा शहरातील अनेक शाळेतील शिक्षक व विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित होते. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी श्री भाऊसाहेब दिवाने कार्यालयीन अधीक्षक पद्मा शिंदे यांच्यासह कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक, सहशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन चव्हाण यांनी केले,तर आभार डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी मानले.

 
Top