धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्ह्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनसह विविध पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंबेजवळगा आणि कौडगाव शिवारात प्रत्यक्ष पाहणी करताना नुकसानीची गंभीर परिस्थिती निदर्शनास आली. त्यामुळे पंचनाम्याच्या नावाखाली वेळकाढूपणा न करता धाराशिव जिल्ह्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 1 लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवारचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी केली.

आंबेजवळगा व कौडगाव परिसरातील शेतांमध्ये पाहणी केली असता सोयाबीनसह इतर पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कष्टाने उभे केलेले पीक हातातून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले असून शासनाने तातडीने ठोस मदत करण्याची गरज असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

“शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका. आता निर्णय हवा, घोषणा नाही; मदत हवी, केवळ पंचनामे नाहीत,” असे डॉ. पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

या पाहणीवेळी रवी ठेंगल, ॲड. योगेश सोन्ने पाटील, ॲड. अविनाश जाधव, सुरज वडवले, राजू शिंदे, काका यादव, चंद्रकांत सुळ, काका शिंदे, अण्णा यादव, नेहाल पठाण, उमेश वायकुळे, अण्णा हाजगुडे, हनुमंत नाईकवाडी, विशाल थोरात, अक्षय नाईकवाडी, श्रीनिवास थोरात, माऊली नाईकवाडी यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.


 
Top