वाशी (प्रतिनिधी)- मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामावर संकटाचे सावट निर्माण झाले असून, पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पिकांना सध्या पावसाची अत्यंत आवश्यकता असताना पावसाने दडी मारल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर वाशी शहरातील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने शुक्रवारी (दि. 18 सप्टेंबर) पावसासाठी नमाज-ए-इस्तिस्का अदा करण्यात आली.

वाशी येथील ईदगाह मैदान, तांदुळवाडी रोड येथे दुपारी 2.30 वाजता या विशेष नमाजचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. नमाज अदा केल्यानंतर अल्लाह तआलाकडे रहमत व भरपूर पावसासाठी सामूहिक दुआ करण्यात आली.

यंदाच्या पावसाळ्यात अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने खरीप पिकांची अवस्था चिंताजनक बनली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेली पिके कोमेजण्याच्या मार्गावर असून, शेतकऱ्यांच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी शेती व्यवसायासमोर निर्माण झालेल्या संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, पावसाचा खंड आणखी वाढल्यास जनावरांसाठी चारा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसासाठी विविध स्तरांतून प्रार्थना केली जात आहे.

नमाज-ए-इस्तिस्का ही पावसासाठी अल्लाहकडे प्रार्थना करण्याची विशेष नमाज मानली जाते. पावसाची कमतरता निर्माण झाल्यास मुस्लिम समाजाकडून सामूहिकरीत्या ही नमाज अदा करून पावसासाठी दुआ केली जाते. वाशी येथेही याच भावनेतून सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. यावेळी “अल्लाह तआला आपल्या रहमतीने भरपूर पाऊस पाडो, शेतकरी व सर्वसामान्य जनतेवरील संकट दूर करो आणि शेतीला नवसंजीवनी मिळो,” अशी भावना उपस्थित मुस्लिम बांधवांनी व्यक्त केली.

 
Top