धाराशिव (प्रतिनिधी)- गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात धाराशिवकरांना महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि लोकसंस्कृतीची अनोखी मेजवानी अनुभवता येणार आहे. सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र राज्य,मुंबई आणि जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने 23 व 24 सप्टेंबर 2026 रोजी गणेशोत्सवनिमित्त ‘महागणेशोत्सव' या दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
धाराशिव शहरातील स्वयंवर मंगल कार्यालय,जिजाऊ चौक,बार्शी नाका येथे 23 व 24 सप्टेंबर रोजी दोन्ही दिवशी सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत हा सांस्कृतिक सोहळा रंगणार आहे. कार्यक्रमात 50 कलावंत सहभागी होणार असून महाराष्ट्राच्या विविध लोककलांचे दर्शन एकाच व्यासपीठावर घडणार आहे.
गणेशोत्सवाचा उत्साह आणि महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा बाज यांचा सुरेख संगम या कार्यक्रमातून साधला जाणार आहे. लावणी,पिंगळा लोकगीत,पोवाडा, गणपती गाणी,वासुदेव,भजन,कीर्तन, भारूड आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलांवर आधारित अभिनय,लोकनृत्य कार्यक्रम,तसेच शेतकरी आत्महत्या या विषयावर एकांकिका सादर करण्यात येणार आहे.त्यामुळे मनोरंजनासोबतच सामाजिक प्रबोधनाचाही संदेश या सांस्कृतिक सोहळ्यातून दिला जाणार आहे.
राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असून या महोत्सवाला व्यापक सांस्कृतिक स्वरूप देण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम हाती घेतले आहेत.त्याचाच एक भाग म्हणून धाराशिवमध्ये आयोजित ‘महागणेशोत्सव' महाराष्ट्राच्या लोककला,परंपरा आणि सांस्कृतिक वैभवाची ओळख नव्या पिढीला करून देणारा ठरणार आहे. लोककलावंतांच्या सादरीकरणातून ग्रामीण संस्कृतीचा अस्सल बाजही धाराशिवकरांना अनुभवता येणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांच्या पुढाकारातून करण्यात आले असून,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी नागरिकांना या सांस्कृतिक सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.प्रवेश विनामूल्य असून,धाराशिव शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी 23 व 24 सप्टेंबर रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा हा रंगतदार सोहळा अनुभवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.