भूम (प्रतिनिधी)- मूळ भूम शहराची कन्या सध्या शिक्षणासाठी लातूर येथे आपल्या आई-वडिलांसोबत राहून शिक्षण घेत आहे. तिने दयानंद कॉलेज ऑफ लॉ, लातूर येथील एलएलबी प्रथम वर्षाची विद्यार्थिनी मिस रेहमतजहान गुलशेर खान पठाण हिने अवघ्या चार दिवसांत चार विविध वक्तृत्व व निबंध लेखन स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या कामगिरीबद्दल दयानंद एज्युकेशन सोसायटी तसेच महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

रेहमतजहान पठाण हिने जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक, तर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. यासोबतच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड स्तरावरील स्पर्धांमध्येही तिने उत्कृष्ट कामगिरी केली. विद्यापीठस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक आणि निबंध लेखन स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवत तिने आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली.

जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन जयक्रांती आर्ट्स सीनियर कॉलेज, लातूर यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या सहकार्याने केले होते. तर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन दयानंद आर्ट्स कॉलेज, लातूर यांनी विद्यापीठाच्या सहकार्याने केले होते.

अवघ्या चार दिवसांत चार पुरस्कार मिळवण्याची कामगिरी ही रेहमतजहान पठाणच्या लेखन, वक्तृत्व आणि अभ्यासू वृत्तीचे द्योतक मानली जात आहे. तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पूनम पी. नाथानी, सांस्कृतिक विभागाचे समन्वयक डॉ. प्रमोद शिंदे तसेच दयानंद लिटरेरी, डिबेटिंग अँड ऑरेटरी सोसायटीचे समन्वयक ॲड. मुस्तफा एम. पठाण यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. “चार दिवसांत चार पुरस्कार” या उल्लेखनीय कामगिरीमुळे दयानंद कॉलेज ऑफ लॉ, लातूरच्या शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील गुणवत्तेचीही पुन्हा एकदा झलक पाहायला मिळाली आहे.


 
Top