तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूरमध्ये महालक्ष्मी उत्सव आता मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असून घरोघर महालक्ष्मींसमोर केलेले देखावे पाहण्यासाठी महिलांची मोठी गर्दी शनिवारी झाली होती . पूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मोठ्या प्रमाणात स्थिर व हलते देखावे सादर केले जात होते. मात्र, कालांतराने ही परंपरा काहीशी कमी होत असताना महालक्ष्मी उत्सवाच्या निमित्ताने घरोघरी देखावे साकारण्याची नवी परंपरा रुजत आहे.
जिजामाता नगर येथील सुनीता रामचंद्र शेंद्रे यांच्या निवासस्थानी महालक्ष्मीसमोर श्री शंभू महादेव मुद्गुलेश्वर महाराजांचा ‘महाकाल' अवतार साकारण्यात आला आहे. महालक्ष्मीच्या मूर्तीसमोर महाकाल स्वरूपाची करण्यात आलेली आकर्षक मांडणी, सजावट आणि प्रकाशयोजनेमुळे हा देखावा विशेष लक्षवेधी ठरत आहे.
दरम्यान, शुक्रवार पेठेतील शरद शहाजी अमृतराव यांच्या घरी ‘शक्तिपीठ तुळजापूर ते भक्तीपेठ पंढरपूर पायी वारी दिंडी सोहळा' या संकल्पनेवर आधारित देखावा साकारण्यात आला आहे. या माध्यमातून तुळजाभवानीच्या नगरीपासून पंढरपूरच्या विठुरायापर्यंतच्या भक्तिमय वारीचे दर्शन घडविण्यात आले आहे. यासोबतच सचिन काळे यांच्या घरी अमरनाथ यात्रा दर्शन सोहळा देखावाही साकारण्यात आला असून, अमरनाथ गुहा, बर्फाचे शिवलिंग आणि यात्रेचे धार्मिक महत्त्व कलात्मक पद्धतीने मांडण्यात आले आहे. त्यामुळे महादेवाच्या विविध धार्मिक स्वरूपांचे दर्शन एकाच ठिकाणी भाविकांना घडत आहे.
महालक्ष्मीच्या आरतीच्या वेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होत असून, आरतीनंतर भाविक व नागरिक देखावे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. महिला, बालक आणि ज्येष्ठ नागरिकांमध्येही या देखाव्यांविषयी विशेष उत्सुकता दिसून येत आहे. घरोघरी साकारले जाणारे हे देखावे तुळजापूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला नवे रूप देत असून, ‘महाकाल' अवतार, अमरनाथ यात्रा आणि पंढरपूर वारीच्या संकल्पनांनी यंदाच्या महालक्ष्मी उत्सवाची रंगत वाढवली आहे.


