धाराशिव (प्रतिनिधी)- रुपामाता परिवारातील रूपामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पाडोळी (आ.) येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून धाराशिव तालुकास्तरीय शालेय क्रीडा व बुद्धिबळ स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून क्रमांक प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रूपामाता उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. व्यंकट गुंड यांच्या सत्कार करण्यात आला.
धाराशिव तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत रूपामाता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवले. प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये श्रावणी राहुल राऊत, चैताली नानासाहेब चव्हाण आणि पृथ्वीराज रणजीत गुंड यांचा समावेश आहे. किरण बळीराम सगर, सगुना अंकुश टिपे, चैताली नानासाहेब चव्हाण आणि ओमकार उत्तरेश्वर सोनटक्के यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच संध्या राहुल राठोड, तनुजा युवराज गुंड, प्रथमेश शरद गुंड, सुजाता सुनील चव्हाण, पुनम धनराज गाते, सुप्रिया अनिल चव्हाण, विद्या राहुल राठोड, मनीषा युवराज गुंड, सायली गोविंद पवार आणि किरण बळीराम सगर यांनी विविध क्रीडा प्रकारांत तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले.
तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेतही रूपामाता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. सायली भागवत सूर्यवंशी हिने प्रथम, सृष्टी विजयकुमार ढोरमारे हिने तृतीय, सुजाता सतीश शिंदे हिने चौथा, तर पुष्कराज प्रदीप गुंड व स्नेहा दत्ता पवार यांनी पाचवा क्रमांक मिळवला. या पाचही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तालुकास्तरीय क्रीडा व बुद्धिबळ स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात ॲड. व्यंकटराव विश्वनाथ गुंड यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना आगामी जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक क्रीडा शिक्षक शेख बी. एम. यांनी केले.
