मुरूम (प्रतिनिधी)- मराठवाड्याच्या मातीला स्वातंत्र्यलढ्याचा मोठा वारसा लाभला असून तो प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. केवळ पुस्तकी ज्ञानापुरता मर्यादित न राहता हा इतिहास आपल्या आचरणात आणि विचारांत उतरवण्याची गरज आहे. मराठवाड्याचा हा इतिहास केवळ इतिहासाच्या पुस्तकातला नसून तो प्रत्येक नागरिकाच्या धमन्यांत वाहणारे देशभक्तीच्या रक्ताचे नाते असल्याचे प्रतिपादन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सायबण्णा घोडके यांनी केले. 17 सप्टेंबर 2026 रोजी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा विभागामार्फत आयोजित व्याख्याना प्रसंगी प्रा. डॉ. सायबण्णा घोडके यांचे ‘मराठवाडा मुक्ती दिन: त्याग, बलिदान आणि प्रेरणा' या विषयावर सखोल व्याख्यान पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार होते. यावेळी माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. महेश्वर होगाडे, आयक्यूएसीचे समन्वयक प्रा. डॉ. राम बजगिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्र्यलढ्यातील आणि मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
डॉ. घोडके यांनी आपल्या व्याख्यानाची सुरुवात करताना रजाकारांच्या अत्याचाराविरुद्ध मराठवाड्यातील जनतेने दिलेला लढा आणि त्या काळातील अभूतपूर्व त्यागाचे वर्णन केले. शेतकरी, कष्टकरी, सुशिक्षित तरुणांपर्यंत सर्वानी यात दिलेल्या बलिदानाचे हृदयस्पर्शी दाखले दिले.
स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, भाऊसाहेब वैशंपायन आणि बाबुराव परांजपे यांच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाचा प्रवास त्यांनी उलगडला. जात, धर्म आणि प्रांतीय भेदाभेद विसरून एकात्मतेची भावना जोपासणे हीच खऱ्या अर्थाने हुतात्म्यांना आदरांजली ठरेल, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
अध्यक्षीय समारोपप्रसंगी डॉ. बिराजदार म्हणाले की, आजच्या तरुण पिढीने आपल्या पूर्वजांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन राष्ट्रउभारणीत योगदान दिले पाहिजे. फक्त स्वातंत्र्य मिळवणे पुरेसे नसून ते टिकवणे आणि देशाच्या प्रगतीत योगदान देणे ही आजच्या तरुणांची जबाबदारी आहे. मुक्ती संग्रामाचा इतिहास हा आपल्याला सदैव देशप्रेमाची आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतो.
प्रास्ताविकात मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास आणि त्याचे आजच्या पिढीसाठी असलेले महत्त्व डॉ. जयश्री सोमवंशी यांनी विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुजित मटकरी तर आभार डॉ. रमेश आडे यांनी मानले. राष्ट्रगीताने या प्रेरणादायी सोहळ्याची सांगता झाली. यावेळी महाविद्यालयातील विविध शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, कर्मचारी वृंद उपस्थित होते.
