धाराशिव (प्रतिनिधी)- मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असताना सरकार कोणतीही दखल घेत नाही. याच्या निषेधार्थ धाराशिव येथे समाजकल्याण विभागाच्या चार मजली इमारतीवर पाच युवकांनी सरकारच्या विरोधात घोषणा देत ठिय्या मांडला आहे. प्रशासनाने व सरकारने दखल न घेतल्यास इमारतीवरून उडी मारू असा इशारा युवकांनी दिला आहे.
गेल्या चार दिवसापासून मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासंदर्भात उपोषणाला बसले आहेत. परंतु सरकार कोणतेही लक्ष त्यांच्या उपोषणाकडे न देता वेळकाडू पणा करत आहे. आमचा सेनापती यांची प्रकृत्ती बिघडली आहे. त्यामुळे सरकारच्या निषेधार्थ आम्ही समाजकल्याण विभागाच्या इमारतीवर चढलो असून, सरकारने जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल न घेतल्यास या इमारतीवरून उडी मारू असा इशारा अमोल जाधव यांने माध्यमांशी बोलताना दिला आहे. अमोल जाधव यांच्यासोबत आकाश मुंडे, मनोज जाधव, बाळासाहेब गुंडाळे, प्रजय पवार हे पाचजण इमारतीवर ठिय्या मांडून बसले आहेत.
