धाराशिव (प्रतिनिधी)-  मराठवाड्यातील आकांक्षित असलेल्या धाराशिव जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पावसाने मोठा खंड दिला आहे. यामुळं सोयाबीन या मुख्य पिकांसह इतर खरीप पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. अशा सर्व भागातील पिकांच्या नुकसानीचा तत्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बुधवारी दि. 2 सप्टेंबर रोजी केली आहे. 

आमदार कैलास पाटील म्हणाले की,.धाराशिव हा प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असलेला जिल्हा असून, सध्या पावसाच्या खंडामुळे प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनसह इतर खरीप पिकांवर गंभीर परिणाम होत आहे. सध्या सोयाबीन पीक फुलोरा व शेंगा लागण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या अवस्थेत आहे. मात्र, पावसाचा दीर्घ खंड पडल्यामुळे जमिनीतील ओलावा मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, वाढत्या तापमानामुळे पिके करपत आहेत. अनेक ठिकाणी सोयाबीनसह इतर पिके हिरवी दिसतात पण जमिनीतील पुरेशा ओलाव्याअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. पाण्याअभावी सोयाबीनची फुले व शेंगा गळून पडत असल्याने आगामी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.

पावसाचा खंड कायम राहिल्यास सोयाबीन तसेच इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीच्या उत्पन्नावरच शेतकरी कुटुंबांचा दैनंदिन खर्च, शेतीचा पुढील खर्च तसेच मुला-मुलींच्या शिक्षणाचा खर्च अवलंबून असतो. सध्याच्या परिस्थितीत पीक उत्पादनावर परिणाम झाल्यास अनेक शेतकरी कुटुंबांना आपल्या मुला-मुलींच्या महाविद्यालयीन शैक्षणिक शुल्काचा खर्च करणे कठीण होणार असून, त्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

 
Top