भूम (प्रतिनिधी)-  तालुक्यात पावसाच्या तुटीमुळे खरीप पिके पूर्णपणे जळून गेली आहेत. शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर भूम तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, तसेच बाधित शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा, पीक अनुदान व तातडीची आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

चालू वर्षाचा पावसाळा संपत आला तरी तालुक्यात बहुतांश भागात अत्यंत अत्यल्प पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून वेळेवर सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि कापूस यांसारख्या खरीप पिकांची पेरणी केली होती. मात्र, पेरणीनंतर तब्बल दीड ते दोन महिने पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने हाताशी आलेली पिके डोळ्यांसमोर करपून गेली आहेत. त्यामुळे भूम तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा. दुष्काळग्रस्त सर्व शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी.  सोयाबीनसह सर्व बाधित पिकांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50 हजार रुपये अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावे. सर्व पात्र शेतकऱ्यांना मंजूर केलेला पीकविमा तात्काळ वितरीत करण्यात यावा. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना बिना-विलंब नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. अशी मागणी काँग्रेस पार्टीच्यावतीने करण्यात आले. शासनाने आणि प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल न घेतल्यास आणि शेतकऱ्यांना वेळेवर दिलासा न दिल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

 
Top