तुळजापूर (प्रतिनिधी)-  सुरुवातीला जोमाने उगवलेली खरीप पिके पावसाने पाठ फिरवल्याने आता कोमात गेली आहेत. पिके हातातून गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, शासनाने तातडीने सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी आणि कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी माजी मंत्री तथा माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी माध्यमातून निवेदन देऊन केले आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना चव्हाण म्हणाले, “राज्यातील बहुतांश आमदार, खासदार आणि मंत्री शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. शेती पिकली नाही तर शेतकऱ्याचे किती नुकसान होते, याची त्यांना जाणीव आहे. यंदाच्या दुष्काळाचा फटका मलाही बसला आहे. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.”

हेक्टरी 50 हजार रुपये सरसकट मदत द्यावी. शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. चारा छावण्या तातडीने सुरू कराव्यात. कर्जवसुली थांबवून मनरेगाची कामे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून द्यावीत.मनरेगाच्या जाचक अटी, विशेषतः विहिरीवरील मजुरांची दोन वेळा होणारी बायोमेट्रिक हजेरीची अट रद्द करावी, करावी अशी मागणी केली. आगामी पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील ‌‘पोळा म्हणजे सण झाला गोळा' या म्हणीचा संदर्भ देत चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. “शेतकऱ्यालाच खायला काही नसेल तर तो जनावरांना कसे सांभाळणार? पशुधन जगवणे हे शेतकरी कुटुंबाचे प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्याला मदतीचा हात दिल्याशिवाय पशुधन वाचवणे कठीण आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी पंचायत समिती सभापती शिवाजी गायकवाड आणि बबन जाधव उपस्थित होते.

 
Top