धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात पावसाअभावी तसेच अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई मिळावी, यासह जिल्ह्यातील विविध सामाजिक प्रश्न आणि महाडीबीटी पोर्टलवरील तांत्रिक अडचणींबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासनस्तरावर तातडीने पाठपुरावा करण्याची विनंती यावेळी करण्यात आली.

धाराशिव जिल्ह्यात यंदा अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. काही भागांत अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून शासनाने योग्य व पुरेशी नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पवार साहेबांकडे करण्यात आली. याशिवाय विद्यार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवरील तांत्रिक अडचणी दूर करणे, तसेच जिल्ह्यातील विविध सामाजिक व जनहिताच्या प्रश्नांवरही बैठकीत चर्चा करण्यात आली. या सर्व प्रश्नांबाबत संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती करण्यात आली. दरम्यान, येत्या काही दिवसांत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब धाराशिव जिल्ह्याच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यावर येणार असल्याची माहिती देण्यात आली. या दौऱ्यादरम्यान पवार साहेब शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार असून, प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना राज्यस्तरावर अधिक प्रभावीपणे वाचा फोडण्यास मदत होणार आहे.

यावेळी गटनेते तथा माजी नगराध्यक्ष, नगरसेवक खलिफा भाई कुरेशी, नगरसेवक बबलू शेख, नगरसेवक इस्माईल शेख, नगरसेवक सुनील आंबेकर, नगरसेवक एजाज काजी, नगरसेवक विशाल शिंगाडे, नरसिंह मेटकरी, नगरसेवक अशोक मामा देवकते, नगरसेवक पंकज भोसले, नगरसेवक सर्फराज कुरेशी तसेच अभियंता सेलचे जिल्हाध्यक्ष सुरज वडवले उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि जनतेच्या विविध प्रश्नांसाठी संघर्ष सुरूच राहणार असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


 
Top