धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात सध्या तापाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.वाढत्या तापाच्या रुग्णांमध्ये डेंग्यू, मलेरियासह अन्य कीटकजन्य आजार उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिक,शाळा- महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांसाठी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. घर आणि परिसरात डासांची पैदास होणार नाही याची खबरदारी घेण्याबरोबरच ताप दोन दिवसांपेक्षा अधिक काळ राहिल्यास तातडीने शासकीय आरोग्य संस्थेत जाऊन तपासणी करण्याचे आरोग्य अलर्ट देण्यात आला आहे.
तापाकडे केवळ ऋतुबदलाचा परिणाम म्हणून दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेणे महत्त्वाचे आहे. घरातील एखाद्या व्यक्तीला ताप आल्यास त्याची योग्य काळजी घेण्याबरोबरच घरापासून शाळा, महाविद्यालय आणि कार्यालयापर्यंत स्वच्छता राखल्यास आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यास मोठी मदत होऊ शकते. आठवड्यातून एक दिवस पाण्याची भांडी पूर्ण कोरडी करा. त्याप्रमाणे जुने टायर वैगरे नष्ट करावे. डासांची पैदासह होणारी ही मुख्य ठिकाणे आहेत.
दोन दिवसांपेक्षा अधिक ताप असल्यास तपासणी करणे आवश्यक आहे. ताप आल्यानंतर स्वतःच्या मनाने औषधे घेणे टाळावे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ‘पॅरासिटामॉल' व्यतिरिक्त अस्पिरिन, आयब्युप्रोफेनसारख्या वेदनाशामक गोळ्या घेऊ नयेत. दोन दिवसांपेक्षा अधिक काळ ताप कायम असल्यास तातडीने जवळच्या रूग्णालयात जावे. आवश्यकतेनुसार डेंग्यू,मलेरिया अथवा विषाणुजन्य आजाराच्या निदानासाठी रक्ताची तपासणी करावी.अंगावर पुरळ येणे,सतत उलट्या होणे,हिरड्यांमधून रक्त येणे किंवा अत्यंत अशक्तपणा जाणवणे यांसारखी गंभीर लक्षणे दिसल्यास विलंब न करता रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करावे. दररोज फिनाईल किंवा ब्लिचिंगसारख्या जंतुनाशकांचा वापर करून स्वच्छता राखावी. तालुका आरोग्य अधिकारी अथवा नगरपालिकेशी संपर्क साधून आवश्यकतेनुसार शाळेच्या परिसरात कीटकनाशक फवारणी आणि धुरीकरण (फॉगिंग) करून घ्यावे.