धाराशिव (प्रतिनिधी)- वर्षानुवर्षे सुरू असलेला न्यायालयीन वाद म्हणजे वेळ,पैसा आणि मानसिक ताणही.अशा प्रलंबित वादांना सामोपचाराने पूर्णविराम देण्याची संधी नागरिकांना राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून मिळणार आहे.राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,सर्वोच्च न्यायालय,नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या निर्देशानुसार शनिवार,12 सप्टेंबर 2026 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार वाहन अपघात प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे,वीज वितरण कंपनीशी संबंधित प्रकरणे, दिवाणी तसेच तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.यासोबतच बँका आणि वीज वितरण कंपन्यांची दाखलपूर्व प्रकरणेही लोकअदालतीमध्ये विचारात घेतली जाणार आहेत. कौटुंबिक व ग्राहक मंचातील प्रकरणांचाही समावेश कौटुंबिक न्यायालय तसेच ग्राहक तक्रार निवारण मंचातील प्रकरणेदेखील या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.त्यामुळे विविध स्वरूपाच्या न्यायालयीन तसेच दाखलपूर्व वादांमध्ये परस्पर सहमतीने तोडगा काढण्यासाठी पक्षकारांना एकाच दिवशी महत्त्वाची संधी उपलब्ध होणार आहे.

लोकअदालतीमध्ये प्रकरण तडजोडीने मिटल्यास संबंधित पक्षकाराने भरलेली न्यायालयीन फी परत मिळते.त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत खर्च झालेला वेळ आणि पैसा वाचण्याबरोबरच दीर्घकाळ चालणाऱ्या वादामुळे निर्माण होणारा मानसिक ताण कमी करण्यासाठीही लोकअदालत उपयुक्त ठरणार आहे. नागरिकांनी आपापसातील वाद सामोपचाराने मिटवून वेळ,पैसा आणि मानसिक ताण-तणाव वाचवावा तसेच राष्ट्रीय लोकअदालतीचा अधिकाधिक लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती.अभिश्री देव आणि सचिव श्रीमती.भाग्यश्री पाटील यांनी केले आहे. ेआपली प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीत ठेवण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांनी जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,उस्मानाबाद किंवा संबंधित तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधावा.तसेच प्रकरण लोकअदालतीमध्ये ठेवण्यासाठी पक्षकारांनी आपल्या वकिलांशीही संपर्क साधावा,असे कळविण्यात आले आहे.राष्ट्रीय लोकअदालतीबाबत अधिक माहितीसाठी 8591903625 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा dlsaosd25@gmail.comया इमेल वर संपर्क साधता येईल असेही कळविण्यात आले आहे.


 
Top