धाराशिव (प्रतिनिधी)- वाढत्या महागाईच्या काळात गरीब आणि गरजू कुटुंबाच्या घरातील चूल नियमित पेटणे,प्रत्येकाच्या ताटात अन्नाचा घास पोहोचणे आणि आर्थिक परिस्थितीमुळे कुणालाही उपाशी राहण्याची वेळ येऊ नये,यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावत आहे.जिल्ह्यात शिवभोजन योजना,राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम,आनंदाचा शिधा आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून लाखो नागरिकांना अन्नसुरक्षेचे कवच मिळत आहे. त्यासोबतच अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना रुपये मोफत साडी वाटपातूनही आधार दिला जात आहे.
राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजना जिल्ह्यातील गरीब,गरजू आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा आधार ठरत आहे.जिल्ह्यात सध्या 16 शिवभोजन केंद्रे कार्यरत आहेत. शिवभोजन योजना सुरू झाल्यापासून 31 जुलै 2026 अखेरपर्यंत गरीब व गरजू नागरिकांना 38 लाख 42 हजार 730 थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे.अत्यल्प दरात पोटभर भोजन उपलब्ध करून देणाऱ्या या योजनेमुळे गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा आणखी एक महत्त्वाचा आधार म्हणजे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम-2013.राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाच्या कक्षेत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 रुपये थेट रोख हस्तांतरणाचा लाभ देण्यात येत आहे.त्यानुसार जिल्ह्यातील 1 लाख 37 हजार 512 लाभार्थ्यांना जून 2025 अखेरपर्यंत 66 कोटी 66 लाख 92 हजार 220 रुपये एवढे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे वितरित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील गरजू कुटुंबांच्या अन्नसुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेचे एकूण 37 हजार 786 कुटुंबे असून,प्रत्येक कुटुंबाला 35 किलो धान्य देण्यात येते.प्राधान्य कुटुंब योजनेचे 1 लाख 3 हजार 193 लाभार्थी असून,प्रति लाभार्थी 5 किलो धान्य प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्यात लाभार्थ्यांना मोफत वितरित करण्यात येत आहे.या योजनांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांच्या मासिक अन्नधान्याच्या गरजेचा मोठा भार हलका होत आहे.
अन्नधान्यासोबतच अंत्योदय कुटुंबांच्या इतर गरजांचाही विचार करण्यात आला आहे.कॅप्टिव्ह योजनेंतर्गत अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना प्रति कुटुंब एक साडी (कापडी पिशवीसहित) मोफत वाटप करण्यात येत आहे.या योजनेअंतर्गत जिल्ह्यास 37 हजार 168 साड्या प्राप्त झाल्या असून, त्यापैकी 26 हजार 374 कुटुंबांना साड्यांचे वितरण करण्यात आले आहे.
गरजूंच्या ताटापासून कुटुंबाच्या आधारापर्यंत
सार्वजनिक वितरण व्यवस्था म्हणजे केवळ स्वस्त धान्य दुकानातून धान्य देणारी यंत्रणा नाही,तर ती गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांच्या दैनंदिन जगण्याला आधार देणारी महत्त्वाची सामाजिक सुरक्षा व्यवस्था आहे.एका बाजूला शिवभोजन केंद्रातून गरजू व्यक्तीला तयार भोजन मिळत आहे,तर दुसरीकडे विविध अन्नसुरक्षा योजनांतून कुटुंबांना नियमित धान्य आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध होत आहे. अंत्योदय कुटुंबांना साडी वाटपातूनही मदतीचा हात दिला जात आहे.गरजूच्या ताटात अन्नाचा घास आणि कुटुंबाला जगण्याचा आधार' देण्याचे काम या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात व्यापक स्वरूपात सुरू आहे.