भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील सामनगाव (जुने) येथे 22 ते 28 सप्टेंबरदरम्यान 13व्या वर्षी भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सद्गुरू शामनाथ महाराज संगीत गाथा पारायण सोहळा धर्मराज दादा महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार असून, सप्ताहाच्या निमित्ताने विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहात श्रावण महाराज अडसूळवाडी, अण्णासाहेब महाराज बोधले, कृष्णा महाराज, लक्ष्मण महाराज कोकाटे, शांतिगिरी महाराज, राजेंद्र महाराज गोंदीकर, बिबीशन महाराज आंदुरे, निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, रंजीत महाराज नेकनूर, बाळासाहेब महाराज रंजाळे, उत्तम महाराज साकत, आचार्य अमृत आश्रम स्वामी महाराज, सुधीर महाराज खोसरे, माधव महाराज रसाळ आदी महाराजांच्या सानिध्यात सकाळ व रात्री कीर्तनसेवा होणार आहे.

सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमाची सुरुवात काकड्याने होणार असून, त्यानंतर संगीत गाथा पारायण, सकाळी 10 ते 12 कीर्तन, दुपारी 12 ते 3 महिलांचे भजन, सायंकाळी 4 ते 5 प्रवचन, 5 ते 6 हरिपाठ, रात्री 8 ते 10 कीर्तन आणि रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत हरिजागर होणार आहे. या माध्यमातून भाविकांना नामस्मरण, कीर्तन, प्रवचन आणि भजनाच्या माध्यमातून आध्यात्मिक अनुभूती घेता येणार आहे.

29 सप्टेंबर रोजी सद्गुरू दास महाराज पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात येणार असून, यानिमित्त पांडुरंग महाराज गिरी वावीकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. सप्ताह यशस्वी करण्यासाठी गायनाचार्य, मृदंगाचार्य, चोपदार, सेवाधारी तसेच स्वच्छता अभियानासाठी कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 
Top