भुम (प्रतिनिधी)- मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या शौर्यपूर्ण इतिहासाचे स्मरण आणि मराठवाड्याच्या सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक व औद्योगिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यासाठी मराठवाडा समन्वय समिती, पुणे यांच्या वतीने मराठवाडा मुक्तिदिन महोत्सव-2026 उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला माजी केंद्रीय सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशेष पोलीस महानिरीक्षक अशोक मोराळे होते.
यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘मराठवाडा भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार डॉ. एकनाथ शेळके, शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार डॉ. मिलिंद आवाड, साहित्य क्षेत्रातील पुरस्कार प्रा. फ. म. शाहाजींदे, प्रशासकीय क्षेत्रातील पुरस्कार हनुमंत आरगुंडे, ‘मराठवाडा मित्र पुरस्कार' मयंक गांधी तसेच उद्योजक क्षेत्रातील पुरस्कार शरद सावंत यांना प्रदान करण्यात आला. प्रमुख पाहुणे डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी आपल्या भाषणात देश आणि समाजासाठी हुकूमशाहीची प्रवृत्ती घातक असल्याचे नमूद केले. एका चांगल्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून समाजात मोठे परिवर्तन घडवून आणता येऊ शकते, यावर त्यांनी विशेष भर दिला.
कार्यक्रमाध्यक्ष अशोक मोराळे यांनी आपल्या भाषणात शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीवर विशेष भर दिला. स्वातंत्र्यानंतर देशातील अनेक समस्या कमी झाल्या असल्या, तरी त्या पूर्णपणे संपलेल्या नाहीत. त्यामुळे समाजातील समस्यांकडे विशेष लक्ष देत प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी ठेवून काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. मराठवाडा समन्वय समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील यांनी आपल्या भाषणात शहरातील जनतेने गावाकडील जनतेची काळजी घेण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमास समितीचे सचिव दत्ताजी त्र्यंबकराव मेहत्रे, उपाध्यक्ष किशोर पिंगळीकर, ‘वैभवशाली मराठवाडा' अंकाचे संपादक मोतीराम पौळ यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
