मुरुम (प्रतिनिधी)-  बसवरत्न पुरस्कार नियोजन समिती, धाराशिव जिल्हा यांच्या वतीने विधान परिषदेवर निवडून आलेले माननीय आमदार बसवराज पाटील यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उमरगा शहर परिसरात 12व्या शतकातील सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारे, जातिभेद निर्मूलनासाठी कार्य करणारे आद्यक्रांतिकारक महात्मा बसवेश्वर महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा व स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन आमदार पाटील यांना समितीच्या वतीने देण्यात आले.

या निवेदनामध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, सामाजिक समता, बंधुता व मानवतेचा संदेश अधिक प्रभावीपणे समाजात रुजावा, तसेच उमरगा शहराच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वैभवात भर पडावी, या उद्देशाने अश्वारूढ स्मारक उभारण्याची मागणी करण्यात आली. आमदार बसवराजजी पाटील यांनी समितीच्या मागणीची सकारात्मक दखल घेत आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा. बापूरावजी पाटील, बळीराजा पानंद रस्ते योजनेचे सहअध्यक्ष शरणजी पाटील, लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मिलिंद लातूरे, भाजप तालुकाध्यक्ष प्रल्हाद काळे, डॉ. सचिन विश्वेकर, माजी नगरसेवक एम. ओ. पाटील, डॉ. मल्लिकार्जुन खिचडे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप भालेराव, डॉ. दत्तात्रय खलंगारे, नगरसेवक राजेंद्र पतगे, मल्लिनाथ दंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच बसवरत्न पुरस्कार नियोजन समितीचे अध्यक्ष सन्नी पाटील, सचिव शिवकांत पतगे, बालाजी कुडुंबले, करण पाटील, संजय म्हेत्रे, बालाजी पतगे, संदीप लिंबाळे यांच्यासह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top