मुरूम (प्रतिनिधी)- येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जल संवर्धन दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (ता. २१) विशेष मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात मानवी जीवनातील पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. विलास खडके यांनी भारतीय संस्कृतीतील पंचमहाभूतांपैकी 'आप' (जल) चे महत्त्व सांगताना "जल हेच जीवन आणि जीवन अनमोल आहे" असा संदेश दिला. वाहत्या पाण्यामधून नम्रता, विनय आणि अहंकाराचा त्याग हे गुण शिकायला मिळतात, असे त्यांनी स्पष्ट केले. पृथ्वीवर ७१ टक्के पाणी आणि २९ टक्के जमीन असून, यापैकी केवळ ३ टक्के पाणीच पिण्यायोग्य (गोडे पाणी) आहे. या मोजक्याच पाण्यावर संपूर्ण जगाची लोकसंख्या, उद्योगधंदे, कृषी आणि व्यवसाय अवलंबून असल्याने पाण्यावर प्रचंड ताण येत आहे. जंगलतोड, पर्यावरणाचा ऱ्हास, जलप्रदूषण, पाण्याचा अतिवापर आणि अपव्यय यांमुळे जलसंकट निर्माण झाले असून, निसर्गाची अनियमितता आणि वाढत्या मागणीमुळे जलसंवर्धन काळाची गरज बनले आहे. पाण्याचे योग्य नियोजन, वितरण, वापर, संरक्षण, प्रदूषणावर नियंत्रण आणि लोकांचा सक्रिय सहभाग याद्वारे जलाचा शाश्वत वापर करणे सर्वांचे आद्य कर्तव्य असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार होते. यावेळी माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. महेश्वर होगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रास्ताविक प्रा. डॉ. जयश्री सोमवंशी यांनी केले.सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुजित मटकरी तर आभार प्रा. डॉ. रमेश आडे यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विविध शाखांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
