मुरुम ( प्रतिनिधी)- भारत शिक्षण संस्था उमरगा संचलित श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथील वाणिज्य विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी वाणिज्य मंडळाचा उद्घाटन सोहळा मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी 12.30 वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. बी. बी. जाधव होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आर पी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. डॉ. रमेश दाबके यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य डॉ. संजय अस्वले उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वाणिज्य मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. डॉ अजित अष्टे यांनी प्रास्ताविकामध्ये वाणिज्य विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, व्यावसायिक व कौशल्यविकासाच्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. वाणिज्य विषयातील सैद्धांतिक ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यावसायिक जगताची ओळख करून देणे, त्यांच्यामध्ये उद्योजकता, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, संवादकौशल्य व आर्थिक साक्षरता विकसित करणे, हा वाणिज्य मंडळाचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. बी. बी. जाधव यांनी विद्यार्थ्यांनी बदलत्या आर्थिक व व्यावसायिक वातावरणाचा अभ्यास करून आपल्या ज्ञानामध्ये सातत्याने भर घालावी, असे आवाहन केले. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी मिळविणे पुरेसे नसून विद्यार्थ्यांनी विविध कौशल्ये आत्मसात करून रोजगाराच्या तसेच स्वयंरोजगाराच्या संधींचा शोध घ्यावा, असे त्यांनी नमूद केले.
उद्घाटक प्रा. डॉ. रमेश दाबके यांनी विद्यार्थ्यांना वाणिज्य शिक्षणाचे बदलते स्वरूप आणि त्यातील नव्या संधी याबाबत मार्गदर्शन केले. डिजिटल तंत्रज्ञान, ई-कॉमर्स, डिजिटल मार्केटिंग, बँकिंग, वित्तीय सेवा, करप्रणाली, स्टार्टअप व उद्योजकता या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी या संधींचा योग्य प्रकारे उपयोग करून घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
प्रमुख मार्गदर्शक डॉ. संजय अस्वले यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच विविध सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन केले. वाणिज्य मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना मांडण्याची, नेतृत्व करण्याची आणि प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मंडळाच्या प्रत्येक उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. वाणिज्य मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी विषयतज्ज्ञांची व्याख्याने, चर्चासत्रे, कार्यशाळा, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व व निबंध स्पर्धा, व्यवसायविषयक प्रकल्प, उद्योजकता विकास कार्यक्रम, बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील मार्गदर्शन, डिजिटल कॉमर्स व डिजिटल मार्केटिंगविषयक उपक्रम तसेच विविध कौशल्यविकास कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
यावेळी उपप्राचार्य डॉ. विनोद देवरकर, प्रा. डॉ. सुभाष इंगळे, प्रा. डॉ. पी. ए. पिटले, प्रा. डॉ. अजित अष्टे (चेअरमन – वाणिज्य मंडळ), डॉ. खंडू मुरलीकर, डॉ. विजयकुमार मुळे, प्रा. ओम पवार, प्रा. विशाल जाधव, प्रा. सुरज सूर्यवंशी, प्रा. सचिन गायकवाड, प्रा. वर्षा हुलगुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. पूजा हांडे तर वैशाली कदम हिने आभार व्यक्त केला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील प्रत्यक्ष घडामोडी समजून घेता याव्यात आणि त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळावी, यासाठी वाणिज्य मंडळ महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वाणिज्य विभागातील प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.
