मुरूम ( प्रतिनिधी)- आजच्या गतिमान युगात बातमी केवळ पोहोचवणे एवढेच माध्यमांचे काम राहिलेले नाही, तर सत्य आणि निष्पक्ष माहिती समाजासमोर आणणे हाच लोकशाहीचा खरा आधार असून ही पत्रकाराची प्राथमिक जबाबदारी आहे. घटनेमागचे सत्य शोधून काढणे हे खऱ्या शोध पत्रकाराचे काम असल्याचे सांगत त्यांनी शोध पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित केले. बातमी तयार करताना तिचा हेतू समाजहित डोळ्यांसमोर ठेवणारा असावा लागतो. सध्याच्या सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) च्या वाढत्या तंत्रज्ञानावर बोलताना त्यांनी पत्रकारांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला. तंत्रज्ञानामुळे माहितीचा ओघ झपाट्याने वाढला असला, तरी यादरम्यान 'फेक न्यूज' पसरण्याचा धोकाही कैक पटींनी वाढला आहे. अशा वेळी पत्रकाराने बातमीची सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय ती पुढे पाठवू नये, कारण तंत्रज्ञान हे साधन आहे साध्य नव्हे, त्याचा वापर विवेकाने करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन चिकुंद्रा येथील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक भैरवनाथ कानडे यांनी केले. मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र संशोधन केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विस्तार केंद्राचे उद्घाटन, व्याख्यान व पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या प्रमाणपत्राचे वितरण कार्यक्रम सोमवारी (ता. २४) रोजी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. 

प्रमुख वक्ते म्हणून बोलताना कानडे यांनी प्रसार माध्यमांची बदलती भूमिका, वृत्तसंकलनातील हेतू व दृष्टिकोन, शोध पत्रकारिता, बातम्यांचे विविध प्रकार तसेच आजच्या डिजिटल युगात पत्रकारांसमोर असणारी जबाबदारी आणि तंत्रज्ञानाच्या काळात घ्यावयाची काळजी या विषयांवर उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार होते. यावेळी संस्थेचे संचालक प्रा. डॉ. सतीश शेळके, नॅक समन्वयक डॉ. मुकुंद धुळेकर, डॉ. शिवपुत्र कनाडे, डॉ. सुशील मठपती, डॉ. विनायक रासुरे, सेवानिवृत्त प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

या अभ्यासक्रमासाठी ३२ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यांचा एकूण निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये रवींद्र सोनवणे (प्रथम), आदिराज गायकवाड (द्वितीय), हिराबाई सोलापुरे (तृतीय), प्रा. अक्षय हलसे (चतुर्थ) क्रमांक पटकाविला तर सुयश हुलपल्ले, सचिन गजधाने, नितीन सूर्यवंशी, भैरवनाथ कानडे, अरबाज शेख, उमरफारूक नुरसे, ऋषिकेश तारे, सुनील कांबळे, लालअहमद जेवळे, प्रभाकर महिंद्रकर, नितीन गजधाने, तेजसिंह कोळगे, वीरभद्र चनपटणे आदींनी विशेष श्रेणी मिळविल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते वैचारिक ग्रंथ, भेटवस्तू, प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. नव्याने पत्रकारिता अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या प्रशांत माने, वैभव कटके, रोहन शिंदे यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 

 यावेळी डॉ. सुशील मठपती म्हणाले की, पत्रकार हा निर्भीड व रोखठोक असला पाहिजे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांनी आपल्या लेखणीतून अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. या उपक्रमामुळे मुरूम परिसरात पत्रकारितेचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक नवे आणि हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. 


अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार म्हणाले की, पत्रकारांनी वास्तविकतेचे भान ठेवून लेखनातून समाज प्रबोधन केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी व्यवसाय व नोकरी करत-करत निरंतर शिक्षण घेऊन स्वतःचे व महाविद्यालयाचे नाव उज्वल करावे. 

यावेळी हिराबाई सोलापुरे, नितीन सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अभ्यासक्रमाचे समन्वय प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राचे संयोजक डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार डॉ. सुजित मटकरी यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारीवृंद व विविध शाखेचे बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या. 

 
Top