धाराशिव (प्रतिनिधी)- ईद-ए-मिलाद निमित्त आझाद चौक, धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेल्या सर्व रोग निदान व रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्यसेवा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमातून अनेक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
शिबिरामध्ये विविध आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांना मार्गदर्शन व वैद्यकीय सल्ला देण्यात आला. तसेच आवश्यक लॅब टेस्ट, रोगनिदान आणि प्राथमिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली. नागरिकांनी शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेतला.
याचबरोबर आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ हा संदेश देत रक्तदात्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला. आरोग्य तपासणीसोबतच रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत करण्याचा सामाजिक संदेश या शिबिरातून देण्यात आला.
या वेळी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक खलिफा भाई कुरेशी, नगराध्यक्ष नेहा ताई काकडे, एपीआय दराडे साहेब, नगरसेवक बबलू भाई शेख, नगरसेवक पंकज भोसले, नगरसेवक सुनील आंबेकर, नगरसेवक अशोक मामा देवकते, नरसिंह मेटकरी, नगरसेवक रवी भैया मुंडे, नगरसेवक अभिजीत काकडे, नगरसेवक प्रवीण माळी, काँग्रेसचे शहराध्यक्ष धनंजय राऊत, गणेशराव वाघमारे, रोहित बागल, रणवीर इंगळे, अॅड. योगेश सोन्नेपाटील, मिलिंद आप्पा पेठे, सचिन अंधारे, सुरज वडवले, शुभम सुकाळे तसेच इतर सहकारी उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार, धाराशिव यांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या सर्व नागरिकांचे, रक्तदात्यांचे, डॉक्टरांचे, आरोग्य कर्मचाऱ्यांचे आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. ईद-ए-मिलादच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर सामाजिक एकोपा, आरोग्यजागृती आणि सेवाभावाचा संदेश देणारे ठरले.
