उमरगा (प्रतिनिधी)- पदवी आणि मेडल हे यशाचे अंतिम टप्पे नसून, पदवीच्या पलीकडेही एक मोठे जग आहे. बदलत्या काळासोबत स्वतःला सतत अद्ययावत ठेवत रोज काहीतरी नवीन शिकण्याची जिद्द विद्यार्थ्यांनी बाळगली पाहिजे, असे प्रतिपादन पत्रकार राजेंद्र हुंजे यांनी केले.
श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात पत्रकार राजेंद्र हुंजे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले होते. तर भारत शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. विजय पाटील हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना राजेंद्र हुंजे म्हणाले की, “आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एक गुरु भेटला पाहिजे. जीवनात अडचणी आणि संघर्ष भरपूर आहेत; मात्र त्यातून मार्ग काढत पुढे जाण्याची क्षमता प्रत्येकाने विकसित केली पाहिजे. मेडल आणि पदवीपेक्षा व्यावहारिक जीवनात आपण कसे वागतो, माणसांशी कसे संबंध ठेवतो आणि परिस्थितीला कसे सामोरे जातो, याला अधिक महत्त्व आहे.” विद्यार्थ्यांनी काळानुसार नवनवीन ज्ञान व कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी केले. जग वेगाने बदलत असून त्या वेगाने पुढे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःमध्येही सातत्याने बदल घडवून आणला पाहिजे. बाहेरील जगात वावरताना आपली उद्दिष्टे निश्चित करणे आणि त्या दिशेने सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
जीवनात पुढे जाण्यासाठी कौशल्यविकासासोबत संशोधनवृत्ती आणि विकासाची दृष्टी जोपासली पाहिजे. ‘Skill -- Researcher -- Developer हा त्रिकोण पूर्ण करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विशेष अतिथी डॉ. विजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, पदवी प्राप्त केल्यानंतर केवळ नोकरी किंवा करिअरच्या मागे न लागता समाजात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करावा तसेच महाविद्यालयीन शिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या प्रगतीसोबतच समाजाच्या विकासासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. विनोद देवरकर यांनी केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी केला. त्यांनी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे संस्कार आणि मूल्ये जपत समाजात आपले योगदान द्यावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पी. एल. सावंत यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रभारी प्राध्यापक डॉ. सुभाष इंगळे यांनी केले. पदवीदान समारंभास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
