धाराशिव (प्रतिनिधी)- पृथ्वीवरील प्रत्येक वनस्पती ही विश्वाची देणगी असून,प्रत्येक वनस्पतीचे पर्यावरणीय महत्त्व अनन्यसाधारण आहे. वनस्पतींमुळेच पृथ्वीतलावरील जीवसृष्टीचे अस्तित्व टिकून आहे.त्यामुळे केवळ वृक्ष लागवड न करता वृक्ष व वनस्पतींच्या संवर्धनाची लोकचळवळ उभी करणे ही काळाची गरज आहे,असे प्रतिपादन कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे सेवानिवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा.डॉ.श्रीरंग यादव यांनी केले.

‌‘हरित धाराशिव अभियान 2.0'च्या अनुषंगाने 8 ऑगस्ट रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत प्रमुख मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रवीण धरमकर होते.शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा.डॉ.निखिल गायकवाड,प्रा.डॉ.एम.एम.लेखक,वन विभागाचे विभागीय वनाधिकारी (प्रा.)जी. एन.येडलावार,सामाजिक वनीकरणचे विभागीय वनाधिकारी विश्वास करे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा.डॉ.यादव म्हणाले,पृथ्वीवर अडीच लाख प्रकारच्या वनस्पती असून प्रत्येक वनस्पतीचे स्वतःचे महत्त्व आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येक वनस्पती महत्त्वाची आहे. जैवविविधता जपणेही तितकेच आवश्यक आहे. पृथ्वीवर माणसाशिवाय सर्व प्राणी आनंदी आहेत.निसर्गात अन्न नसेल तर सोन्याचे काय काम.अन्नाशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही.निसर्गाचे सौंदर्य शब्दांतही सांगता येत नाही.‌‘जोपर्यंत वृक्ष लागवड व संवर्धनाची लोकचळवळ आपण उभारणार नाही, तोपर्यंत ही मोहीम यशस्वी होणार नाही, असे सांगून त्यांनी समाजाला यासाठी जागृत करण्याची गरज व्यक्त केली. जिल्ह्याचे वनाखालील क्षेत्र केवळ एक टक्का आहे,ही चिंतनीय बाब आहे.आज वन विभागाच्या जमिनीवर जेवढी वने आहेत,तेवढीच वाचली असल्याचे दिसते, असेही त्यांनी नमूद केले.

प्रा.डॉ.यादव म्हणाले की,पृथ्वी ही चार अब्ज वर्षांची आहे.आपण सर्वजण एकाच आईची लेकरे आहोत.जगातील दोन तृतीयांश जमीन कृषीखाली आणली आहे.पृथ्वीवर दहा हजार वर्षांपासून मानवाने शेती करण्यास सुरुवात केली.जीवनात अन्न महत्त्वाचे असून ते वनस्पतींपासून मिळते.सर्व औषधी वनस्पतींपासून तयार होत असल्याचेही त्यांनी सांगितले.


‌‘जंगल म्हणजे केवळ झाडे नव्हेत'

झाडे म्हणजेच जंगल नाही,तर गवताळ प्रदेशदेखील पर्यावरण संतुलनासाठी तितकाच महत्त्वाचा आहे.गवताची मुळे माती धरून ठेवत असल्याने जमिनीची धूप थांबते.त्यामुळे पर्यावरण संतुलन राखण्यात गवताळ भागाची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रा.डॉ.यादव यांनी स्पष्ट केले.

येणाऱ्या पिढ्यांसाठी आपल्याला काम करायचे आहे.त्यांच्यामध्ये पर्यावरणविषयक जनजागृती करून पर्यावरणाचे महत्त्व सांगणे आणि पर्यावरणविषयक शिक्षण देणे आवश्यक आहे.यातूनच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवडीची ओढ निर्माण होईल.वनस्पती आणि गवत असतील तर वाघ राहतील,असेही त्यांनी नमूद केले.


विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यासाठी त्यांच्या बिया गोळा करणे महत्त्वाचे आहे.जगात जैवविविधतेच्या बाबतीत आपला देश सर्वांत श्रीमंत आहे.त्यामुळे प्रत्येक वृक्षाची जात वाचविली पाहिजे.वृक्ष हे मानवाचे चांगले मित्र असून ते चांगले डॉक्टर,संशोधक, अर्थतज्ज्ञ,शिक्षक,कलाकार,अभियंते व डिझायनरदेखील आहेत.वृक्ष लागवड ही लोकचळवळ म्हणून उभी राहिली तरच पर्यावरणाचे संवर्धन होईल,असे प्रा.डॉ.यादव यांनी सांगितले.

प्रा.डॉ.निखिल गायकवाड म्हणाले की, ‌‘हरित धाराशिव अभियान' हा अत्यंत चांगला आणि निश्चितच वाखाणण्याजोगा उपक्रम आहे.धाराशिव जिल्हा अवर्षणग्रस्त असून दरवर्षी जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागतो. जिल्ह्याचा केवळ एक टक्का भाग वनाच्छादित आहे.मानवी जीवनात वनस्पतींचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.आपण जे वृक्ष लावतो,ते जगविले पाहिजेत.

या अभियानाच्या माध्यमातून सर्वजण एकत्र येऊन वृक्ष लागवड करणार आहोत. देशातील कमी शिकलेल्या व काही निरक्षर असलेल्या महिलांनीदेखील वृक्ष लागवडीत आपले योगदान दिले आहे.त्यांच्या या पर्यावरणपूरक योगदानाची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.या वृक्ष लागवड मोहिमेमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


गतवर्षी 15 लाख वृक्ष लागवड; 85 टक्क्यांपेक्षा अधिक झाडे जिवंत

प्रास्ताविकातून अभियानाचे महत्त्व सांगताना उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर म्हणाले की,हा कार्यक्रम जिल्हा प्रशासन आणि लोकसहभागातून आयोजित करण्यात आला आहे.मागील वर्षी 15 लाख वृक्षांची लागवड करण्यात आली असून,यातील 85 टक्क्यांपेक्षा जास्त झाडे जिवंत आहेत.वृक्ष लागवडीनंतर दर सहा महिन्यांनी त्याचा अहवाल सादर करण्यात येईल.या वृक्ष लागवड मोहिमेतून होणाऱ्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या नोंदीसाठी त्रयस्थ संस्थेकडून वनस्पतीशास्त्रज्ञ परीक्षण करणार आहेत.14 ऑगस्ट रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत या मोहिमेअंतर्गत आठ ठिकाणी एकाच वेळी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


रोपट्याला पाणी देऊन बैठकीचा प्रारंभ झाला.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी देऊन बैठकीची सुरुवात करण्यात आली.मान्यवरांना रोपटे देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.प्रा.डॉ.यादव यांनी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.त्यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून वनस्पती आणि मानवी जीवनातील वनस्पतींचे महत्त्व यावर प्रकाश टाकला.

मान्यवरांचा परिचय प्रा.डॉ.बिराजदार यांनी करून दिला.या आढावा बैठकीस गटविकास अधिकारी,नायब तहसीलदार, वनपरिक्षेत्र अधिकारी,सहाय्यक गटविकास अधिकारी तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ विज्ञान महाविद्यालयांच्या वनस्पतीशास्त्र विभागातील प्राध्यापकवर्ग,रोहयो,वन, सामाजिक वनीकरणचे कर्मचारी तसेच विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते. आभार विभागीय वनाधिकारी जे.एन. येडलावार यांनी मानले.


 
Top